वातावरणातील आद्रतेतून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती

By admin | Published: August 30, 2016 05:18 PM2016-08-30T17:18:45+5:302016-08-30T17:18:45+5:30

नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हैदराबाद येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या अकोल्याच्या ‘रँचो’ने एक लहानसे उपकरण तयार केले आहे

Generation of potable water from wetlands | वातावरणातील आद्रतेतून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती

वातावरणातील आद्रतेतून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती

Next
>राम देशपांडे / ऑनलाइन लोकमत -
अकोल्याच्या जव्वाद पटेलने तयार केले अत्याधुनिक उपकरण
अकोला, दि. 30 - दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. अशा परिस्थितीचा सामना करणार्‍या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हैदराबाद येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या अकोल्याच्या ‘रँचो’ने एक लहानसे उपकरण तयार केले आहे. जव्वाद पटेल असे या युवकाचे नाव असून, वातावरणातील आद्रतेतून तासाभरात दोन लीटर पिण्यायोग्य पाणी गोळा होईल असे एक अत्याधुनिक उपकरण त्याने तयार केले आहे.
 
भन्नाट कल्पकता आणि जिज्ञासू वृत्ती असलेल्या जव्वादने वर्षभरापूर्वी तयार केलेल्या अत्याधुनिक ‘हेल्मेट’बाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. हैदराबाद येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या जव्वादने थर्मोडायनॅमिक टेक्नॉलॉजीवर आधारित ८00 ग्रॅम वजनाचे एक उपकरण तयार केले आहे. मोबाइलप्रमाणेच अर्धा तास बॅटरी रिचार्ज केल्यानंतर किमान आठ तास ते चालते. मुख्यत्वे चार प्रमुख भागात विभागलेल्या या उपकरणाची रचना जव्वादने स्वत: थ्रिडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने केली आहे. संगणकीय तंत्रज्ञानावार आधारित या उपकरणाच्या वरच्या भागातील ६ व्होल्टचा पंखा वातावरणातील आर्दतेनुसार कमी-अधिक वेगाने फिरून आतमध्ये येणारी हवा अधिक थंड करतो. त्याखाली ‘स्मार्ट कंडेन्सर’ लागले असून, ते आतमध्ये येणार्‍या हवेतील दवबिंदू विलग करते. त्याखाली तीन गाळण्या लागल्या असून, त्यातील पहिली गाळणी हवेतून विलग झालेल्या दवबिंदूंमधील विषारी धुलीकण विलग करते. त्याखाली ‘यूव्ही’ टेक्नॉलॉजी  वापरण्यात आली असून, अट्राव्हायलेट किरणे खाली आलेल्या दवबिंदूंमधील उर्वरित विषाणू घटक नष्ट करतात. तर तिसर्‍या गाळणीमध्ये संकलित होणार्‍या पाण्याच्या थेंबांमध्ये लोह, कॅल्शियम आदी खनिज तत्त्वे मिसळली जातात. या सर्व प्रक्रियेतून खाली येणारे दवबिंदू खालच्या जारमध्ये संकलित होतात. तासाभरात दोन लिटर पाणी संकलित करण्यासाठी वातावरणात किमान ३0 टक्के सापेक्ष आद्र्रता असणे गरजेचे आह; त्यापेक्षा कमी आद्रता असेल तर जारमध्ये पाणी संकलित होण्यास अधिक वेळ लागू शकतो असे जव्वादचे म्हणणे आहे. 
 
जव्वादने तयार केलेल्या या उपकरणाची नोंद चेन्नईच्या स्वामित्व हक्क (पेटंट) कार्यालयाने घेतली असून, व्यावसायिक तत्त्वावर निर्मिती करण्यासाठी याला भारतासह अनेक देशांतून मागणी होत असली तरी, ‘मेक इन इंडिया’ या योजनेंतर्गत या उपकरणाची निर्मिती भारतातच करून, सर्वप्रथम त्याचा लाभ भारतीयांना करून देण्याचा मानस जव्वादने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. 
डिस्प्लेवर संपूर्ण माहिती
जव्वादने या उपकरणास एक ‘डिसप्ले स्क्रिन’ लावली आहे. ज्यामध्ये परिसरातील वातावरणातील आद्र्रतेची टक्केवारी, पंख्याची गती, कुठला भाग निकामी झाल्यास त्याची सूचना, जारमध्ये संकलित किती पाणी संकलित झाले आदी माहिती त्यावर झळकते. त्याचबरोबर या उपकाणस चार्जिग इंडिकेटर, पाण्याचा जार भरल्याची सूचना देणारे इंडिकेटर ही सुविधादेखील आहे.

Web Title: Generation of potable water from wetlands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.