एसटी स्थानकांतील जेनेरिक औषधालयांचा मुहूर्त हुकणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 05:06 AM2018-10-30T05:06:19+5:302018-10-30T05:06:44+5:30
कंत्राट नियुक्तीच्या वादाचा फटका; योजना लांबणीवर पडण्याची चिन्हे
- महेश चेमटे
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील २२ महिने रखडलेली जेनेरिक (स्वस्त दरातील औषधे) औषधालये दिवाळीच्या मुहुर्तावर सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, एसटी स्थानकांमध्ये ही औषधालये सुरू करण्यासाठी कंत्राट नियुक्तीवरून वाद सुरू असल्याने योजना लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील एसटी स्थानकांत जेनेरिक औषधालये सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, महामंडळातील तब्बल ६०९ एसटी स्थानकावर कंत्राट कोणत्या कंपनीला द्यायचे? यावरून सध्या महामंडळातील अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. पहिल्या दोन निविदेत प्रतिसाद न मिळाल्यामुळे ७ जुलै रोजी औषधालयांसाठी तिसºयांदा निविदा मागविण्यात आल्या. या वेळी ६ निविदाकारांनी जेनेरिक औषधालयांबाबत स्वारस्य दाखविले, परंतु मर्जीतील निविदाकारांना कंत्राट मिळावे, यासाठी वरिष्ठ अधिकाºयांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, याला महाव्यवस्थापकांकडून होणाºया विरोधामुळे कंत्राटदारांची नियुक्ती सुमारे महिनाभरापासून प्रतीक्षेत आहे.
प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी परियोजनेंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना स्वस्त दरात औषधे मिळावीत, यासाठी आॅगस्ट २०१६ मध्ये एसटी महामंडळात जेनेरिक औषधालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. एसटी स्थानके ही मध्यवर्ती ठिकाणे असल्यामुळे प्रवाशांसह सर्वसामान्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाºया एसटी महामंडळातील अधिकाºयांच्या वादामुळे ‘आरोग्यदायी’ योजनेला मुहूर्त मिळेनासा झाला आहे.
अद्याप निर्णय झालेला नाही
एसटी स्थानकांवर जेनेरिक औषधालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जेनेरिक औषधालयांच्या कंत्राटदारांच्या नियुक्तीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कंत्राटदार नियुक्त केल्यानंतर औषधालय एसटी स्थानकात सुरू करण्यात येईल.
- रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ.