‘प्रिस्क्रिप्शन’वर जेनेरिक औषधे
By Admin | Published: May 14, 2014 05:12 AM2014-05-14T05:12:57+5:302014-05-14T05:12:57+5:30
आजघडीला प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात.
नागपूर : आजघडीला प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यातच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांच्या तुटवड्यांमुळे सामान्य रुग्णांचे हाल होत असल्याचे नेहमीचे चित्र आहे. या वास्तवाची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाने सोमवार १२ मेपासून ‘प्रीस्क्रीप्शन’ लिहून देताना जेनेरिक औषधे लिहनू द्यावी, असे फर्मान काढले आहे. सामान्य औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधांची किंमत फारच कमी असते. (उदाहरणार्थ डॉक्टरांनी सर्दीच्या औषधाचे प्रीस्क्रीप्शन दिले. मेडिकल स्टोअर्समध्ये त्या औषधाची किंमत २० रु पये असेल, तर जेनेरिक औषधाची किंमत ही ५ रु पये असते.) जेनेरिक औषधांची जाहिरात होत नसल्याने ती स्वस्त असतात. सामान्य आणि जेनेरिक औषध बनवण्याचे सूत्र सारखेच असते. भारत हा जेनेरिक औषधे बनवण्यात आघाडीवर आहे. भारतात तयार केलेली जेनेरिक औषधे आफिक्रा तसेच अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात. याला घेऊन मेडिकल प्रशासन वारंवार सर्व विभागप्रमुखांना जेनेरिक औषधे देण्याची सूचना देत आले आहे. परंतु आता अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या स्वाक्षरीचे पत्रच सर्व विभागप्रमुखांना दिले आहे. यात रुग्णांना बाहेरून औषधे लिहून देताना जेनेरिक औषधे लिहून द्या, असे बजावले आहे.