अस्सल कोल्हापुरी १५ किलोची चप्पल
By Admin | Published: April 27, 2015 03:28 AM2015-04-27T03:28:36+5:302015-04-27T03:28:36+5:30
संपूर्ण राज्यात कोल्हापुरी चपलेची भारदार व रुबाबदार चप्पल म्हणून ख्याती असून, ती घालून चालताना होणाऱ्या कर्रकर्र आवाजामुळेच तिला नावलौकिक प्राप्त झाला आहे
राजीव लोहकरे, अकलूज
संपूर्ण राज्यात कोल्हापुरी चपलेची भारदार व रुबाबदार चप्पल म्हणून ख्याती असून, ती घालून चालताना होणाऱ्या कर्रकर्र आवाजामुळेच तिला नावलौकिक प्राप्त झाला आहे. फॅशनच्या जमान्यात अशा चपला वापरणारे आणि बनवणारे कमी झाले असले तरी माळशिरस तालुक्यातील आनंदनगर-अकलूज येथील बिभीषण राऊत याने १५ किलोची चप्पल बनवली असून, ती चक्क नऊ हजाराला विकली
बिभीषण राऊत यांच्या जोधपुरी व कोल्हापुरी पादत्राणे दुकानाचा नावलौकिक ऐकून सुळेवाडी येथील दाजी अनंता दोलतोडे यांनी राऊत यांच्याकडे वेगळी व आकर्षक अशा चपलेची मागणी नोंदवली़ दोलतोडे हे गेली २५ वर्षांपासून कोल्हापुरी चप्पलचे शौकीन असून, त्यांनी नेहमीच वजनदार कोल्हापुरी चपला वापरल्या आहेत. त्यामुळेच हटके चप्पल बनविण्याची आॅर्डर त्यांनी दिली. तब्बल महिनाभरानंतर १५ किलो वजनाची अस्सल कोल्हापुरी चप्पल साकारली गेली. चप्पलचे डिझाइन निवडल्यानंतर राऊत यांनी चप्पल बनविताना अडीच इंच जाडीची टाच, दीड इंच जाडीचा तळवा तयार करून एक फूट उंचीची रुबाबदार चप्पल तयार केली. हे करताना २४ नटबोल्टाबरोबरच लोखंडी नाल, फिरक्या, गोंडा, जर, वेणी, पितळी रिंगा, रिबीट, काचेच्या टिकल्यांचा वापर केला. चप्पलला तीन नागफण्या केल्या. त्याला मोत्यांच्या माळांनी सजवून बाजूंनी घुंगरांची जोड दिली, तर चपलेला घोड्याच्या टाचेची नाल वापरली. त्यामुळे चप्पल अधिकच आवाज करू लागली. ही चप्पल त्यांनी ९ हजार रुपयांस विकली.