जीओ टॅगिंगची यंत्रणा यशस्वी
By admin | Published: April 26, 2016 04:17 AM2016-04-26T04:17:19+5:302016-04-26T04:17:19+5:30
महानगरपालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकता यावी, कामांची पुनरावृत्ती टाळावी आणि सुरू असलेल्या कामांची स्थिती काय आहे
ठाणे : महानगरपालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकता यावी, कामांची पुनरावृत्ती टाळावी आणि सुरू असलेल्या कामांची स्थिती काय आहे, ते कोणत्या टप्प्यावर आहे, याची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देशात सर्वप्रथम जीओ टॅगिंग यंत्रणा राबवण्याचा मान मिळवला होता. ही यंत्रणा यशस्वी झाल्याचा दावा आता पालिकेने केला आहे. विशेष म्हणजे इतर शासकीय यंत्रणाही जीओ टॅग यंत्रणा वापरण्याविषयी सकारात्मक विचार करीत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
याबाबत, अलीकडेच केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयानेही हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयुक्तांनी जीओ टॅगिंगचा घेतलेला निर्णय आता अनेक शासकीय यंत्रणा राबवण्याचा विचार करीत असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी करोडो रुपयांची विकासकामे करण्यात येतात. या कामांचे योग्य मूल्यमापन व्हावे, कामांमध्ये पारदर्शकता राहावी, कामांची काय प्रगती आहे, त्याचत्याच कामांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक कामाचे जीओ टॅगिंग झाल्याशिवाय त्याचे देयक अदा करू नये, असे आदेश काढले होते. यावरून, लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला स्थायी समिती आणि महासभेत चांगलेच धारेवर धरले होते. (प्रतिनिधी)