भूवैज्ञानिकांकडून होणार शहराचे सर्वेक्षण
By admin | Published: August 10, 2014 12:09 AM2014-08-10T00:09:16+5:302014-08-10T00:09:16+5:30
बुलडाणा नगरपालिका प्रशासनाचा निर्णय : आपत्तीच्या उंबरठय़ावरील वस्त्यांची नोंद
बुलडाणा : शहराच्या चारही बाजूंनी असलेल्या टेकड्या कोरून त्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोकादायक वस्त्यांचा भूवैज्ञानिक विभागाकडून सर्व्हे करून कायमस्वरूपी 'अँक्शन प्लॅन' तयार करण्यात येईल, अशी माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओव्हळ यांनी ह्यलोकमतशीह्ण बोलताना दिली. माळीण येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पृष्ठभूमीवर 'बुलडाणा शहराला भूस्खलनाचा' धोका असे वृत्त 'लोकमतने' प्रकाशित करून शहरालगतच्या अशा धोकादायक वस्त्याकडे नगर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची पालिकेने लगेच दखल घेत जिल्हा भूवैज्ञानिक विभागाशी या संदर्भात चर्चा केली. सोमवार ११ ऑगस्ट रोजी भूवैज्ञानिक विभागाशी पत्रव्यवहार करून एका स्वतंत्र पथकाद्वारे बुलडाणा शहराच्या सीमारेषेवर असलेल्या टेकड्यांची पाहणी केल्या जाईल. या पाहणीतील निष्कर्षानंतर ज्या भागात धोकादायक स्थिती आढळून येईल तेथे अवैधरित्या घरे बांधून वस्ती केलेल्या लोकांचा पालिकेच्या वतीने स्वतंत्र सर्व्हे करण्यात येईल व आवश्यकता भासल्यास अशा ठिकाणची घरे दुसरीकडे हलविण्यात येतील.
दरम्यान, लोकमतने या विषयावर प्रकाश टाकून आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दलही त्यांनी लोकमतचे आभार मानले.
** माळीणची दुर्दैवी घटना ही इतर ठिकाणासाठी धोक्याची घंटा ठरलेली आहे. त्यादृष्टीने अशी घटना भविष्यात आपल्या शहरात घडू नये त्यासाठी उपाययोजना करणे हे पालिकेचे कर्तव्य आहे त्यासाठी आता नगरपालिका कठोर पावले उचलणार असल्याचेही मुख्याधिकारी ओव्हळ यांनी सांगितले. यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)
** नगरसेवकांनाही देणार सूचना
शहरात रोजगारासाठी आलेल्या मजूर वर्गाने जागा मिळेल तेथे अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या अशा भागातील नगरसेवकसुद्धा नळ, लाईट व इतर सुविधा मिळण्यसाठी पालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्रासाठी आग्रही असतात. मात्र एखादी अप्रिय घटना घडली किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. हा धोका टाळण्यासाठी आशा धोकादायक ठिकाणी अवैधरित्या वस्त्या उभ्या राहत असल्यास अशा लोकांना नगरसेवकांनीसुद्धा प्रोत्साहन न देता प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, अशा सूचनाच आम्ही नगरसेवकांना देणार असल्याचे मुख्याधिकारी ओव्हळ यांनी सांगितले.