जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; मिर्झा बेग जामिनावर बाहेर, १३ वर्षांनी जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:36 PM2024-01-06T13:36:36+5:302024-01-06T13:37:42+5:30

बेगला २०१० मध्ये एटीएसने अटक केली होती. 

German Bakery Bomb blast; Mirza Baig out on bail, bail after 13 years | जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; मिर्झा बेग जामिनावर बाहेर, १३ वर्षांनी जामीन

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; मिर्झा बेग जामिनावर बाहेर, १३ वर्षांनी जामीन

मुंबई : पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी मिर्झा हिमायत बेग याला अटकेनंतर तब्बल १३ वर्षांनी जामीन मंजूर करण्यात आला आहे. बेगला २०१० मध्ये एटीएसने अटक केली होती. 

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने बेगच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद ऐकून १९ डिसेंबर रोजी निकाल राखून ठेवला. शुक्रवारी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. बेग सध्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. विशेष न्यायालयाच्या निर्णयाला बेगने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  

उच्च न्यायालयाने त्याची १ लाख रुपयांच्या वैयक्तिक बंधपत्रावर व त्याच रकमेचे दोन हमीदार सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी नाशिकच्या एटीएस कार्यालयात  हजेरी लावणे व नाशिक सत्र न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर न जाण्याची अट न्यायालयाने बेगला घातली. 

जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट
१३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यातील कोरेगाव येथील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला. त्यात १७ जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये पाच परदेशी नागरिकांचाही समावेश होता.

आरडीएक्स जप्त केल्याचा एटीएसचा दावा
या आदेशाला स्थगिती देण्याची एटीएसने केलेली विनंती यावेळी न्यायालयाने फेटाळली. एटीएसने बेगला ७ सप्टेंबर २०१० रोजी अटक केली. त्याच्या उदगीर येथील निवासस्थानातून १.२ किलोग्रॅम आरडीएक्स जप्त केल्याचा दावा एटीएसने केला आहे. 

२०१६ मध्ये जन्मठेपेची शिक्षा
बेग याला पुणे सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेला बेगने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्याला दहशतवादाच्या आरोपातून मुक्त करत फाशीच्या शिक्षेत कपात केली. मात्र, त्याच्या ताब्यात आरडीएक्स असल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला २०१६ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 
 

Web Title: German Bakery Bomb blast; Mirza Baig out on bail, bail after 13 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.