जर्मनीचा दूतावास महाराष्ट्रातील शाळांच्या प्रेमात; ७५ शाळा दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 08:45 AM2021-10-23T08:45:53+5:302021-10-23T08:46:11+5:30

दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांचा संवाद

German embassy adopts 75 schools in maharashtra | जर्मनीचा दूतावास महाराष्ट्रातील शाळांच्या प्रेमात; ७५ शाळा दत्तक

जर्मनीचा दूतावास महाराष्ट्रातील शाळांच्या प्रेमात; ७५ शाळा दत्तक

Next

- अविनाश साबापुरे  

यवतमाळ : माणूस यशाच्या आकाशात कितीही उंच गेला तरी त्याचे पहिले प्रेम मातृभूमीच असते. महाराष्ट्रातून थेट जर्मनीच्या दूतावासात नोकरीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी तेथून महाराष्ट्रातील शाळांच्या सुधारणांसाठी पुढाकार घेतला आहे. दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांचा परस्पर संवाद घडवीत येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढविण्यावर जोर देण्यात येत आहे. 

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जर्मनीतील दूतावासातील भारतीय अधिकाऱ्यांनी हा विशेष उपक्रम आखला. त्याला ‘ग्लोबल महाराष्ट्र-स्टुडंट ऑफ द फ्युचर’ असे नाव दिले. मूळ नांदेड येथील रहिवासी आणि आता जर्मनीमध्ये म्युनिक येथील दूतावासात राजदूत असलेले डॉ. सुयश चव्हाण यांनी हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी मूळचे महाराष्ट्रीयन असलेले जर्मनीतील नागरिक एकत्र केले. त्यात अभिजित माने, प्रीती राव, दुर्गा खटखटे, केदार जाधव आदींचा समावेश आहे. या सर्व उच्चपदस्थ मंडळींनी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून ७५ शाळांची निवड केली. 
नुकतेच १८ ऑक्टोबर रोजी या ७५ शाळांमधील विद्यार्थ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन जर्मनीतील विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडविला. दोन्ही देशांतील भाषा, सण-उत्सव, संस्कृतीची देवाणघेवाण झाली. जर्मनीतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील इच्छुक विद्यार्थ्यांना जर्मन भाषाही शिकविली जाणार आहे.  

यवतमाळातील तीन शाळांचा समावेश  
जर्मनीतील भारतीय दूतावासाने सुरू केलेल्या स्टुडंट ऑफ द फ्युचर उपक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील झरी या दुर्गम तालुक्यातील तीन शाळांची निवड करण्यात आली. 
त्यात सिंधी वाढोणा, अहेरअल्ली आणि दाभा या शाळांचा समावेश आहे. 
झरीचे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर आणि 
गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांचे राजदूत डॉ. सुयश चव्हाण यांच्याशी असलेले स्नेहबंध त्यासाठी उपयुक्त ठरले.  

आमच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात 
जर्मन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दूतावास कसे असते याची त्यांना माहिती मिळाली. रितेश उदे, क्रिश राऊत, अनुश्री भोयर, श्रुती राऊत, ईश्वरी केळवतकर, सुप्रिया ठाकरे या विद्यार्थ्यांनी जर्मन विद्यार्थ्यांशी संवाद केला. शंकर केमेकर, सुनील वाटेकर, नेहा गोखरे, बबिता उदे हे शिक्षकही सहभागी झाले. प्रधान सचिव नंदकुमार यांच्या प्रेरणेने आम्ही आणखी पुढे जाऊ. 
- प्रकाश नगराळे, गटशिक्षणाधिकारी, झरी

Web Title: German embassy adopts 75 schools in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.