पंधरा युवा फुटबॉलपटूंची प्रशिक्षणासाठी जर्मनवारी
By admin | Published: August 19, 2015 12:19 AM2015-08-19T00:19:35+5:302015-08-19T00:19:35+5:30
सहा वर्षांचा दौरा : कोल्हापूरच्या दोघांचा समावेश
मुंबई : भारतात क्रीडा म्हटले तर सर्वांत आधी डोळ्यांसमोर येते ते क्रिकेट. त्यात स्पोर्टस् करिअर करायचे म्हटले तरीही बहुतेकांचा कल हा क्रिकेटकडे असतो. मात्र, काहीजणांनी क्रिकेटच्याही पलीकडे जाण्याचे धाडस करून स्वत:ची ओळख निर्माण केली. अशाच प्रकारचे फुटबॉल खेळामध्ये करिअर करण्याचे धाडस केलेल्या १५ वर्षांखालील १५ नवोदित खेळाडूंना थेट जर्मनी येथे फुटबॉल प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे आणि तीसुद्धा तब्बल सहा वर्षांसाठी. यू ड्रीम फुटबॉल उपक्रमाअंतर्गत फुटबॉलसाठी देशभरात झालेल्या निवड चाचणी प्रक्रियेतून या अव्वल खेळाडूंना जर्मनवारीची सुवर्णसंधी मिळाली आहे.
विशेष म्हणजे या निवडलेल्या अव्वल १५ खेळाडूंपैकी सहा खेळाडू महाराष्ट्राचे असून, यामध्ये कुमार राठोड, इशांत राणा, रॉल लुईस (सर्व मुंबई), प्रणव कणसे, अनिकेत वरेकर (दोघेही, कोल्हापूर) आणि मनीष सिद्धा (पुणे) यांचा समावेश आहे. एकूण ४५ शहरांमध्ये घेण्यात आलेल्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतून अव्वल ठरलेल्या या १५ खेळाडूंना जर्मनी येथे पुढील सहा वर्षांसाठी अव्वल दर्जाचे प्रशिक्षण मिळणार असून, या सर्वांचे शिक्षणदेखील जर्मनी येथे सहा वर्षांसाठी सीबीएसई बोर्डाअंतर्गत होईल.
या सहा वर्षांच्या अभ्यास दौऱ्यामध्ये भारतीय खेळाडूंना जर्मनीतील लोकप्रिय लीग स्पर्धा बुंदेसलिगा स्पर्धेतील ‘टीएसजी १८९९ हॉफेनहेम’ संघाच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार महेश गवळी आणि जॉन केनेथ राज यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होणाऱ्या या नवोदित मुलांना जर्मन प्रशिक्षकांकडूनदेखील मार्गदर्शन मिळेल. (क्रीडा प्रतिनिधी)