रेल्वेस्थानकात ७१ रुपयांत मिळवा तासभर एसी रुम; जाणून घ्या कशी कराल बुक?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 07:55 AM2023-05-10T07:55:13+5:302023-05-10T08:00:12+5:30
डॉरमेट्री रुमचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने त्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मनोज मालपाणी
नाशिकरोड रेल्वे - स्थानकावर आजच्या घडीला प्रवाशांसाठी तीन वातानुकूलित रुम आहेत. तीनही रुम खासगी ठेकेदाराला चालवण्यास देण्यात आल्या आहेत.
डॉरमेट्री रुमचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने त्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. एका रुममध्ये दोन प्रवासी राहू शकतात. त्यासाठी प्रवाशांकडून तासानुसार भाडे आकारणी केली जाते. २४ तासांकरिता रुम भाड्याने घेतल्यास १ हजार ७०४ रुपये भाडे आकारणी केली जाते. बाहेरील खासगी हॉटेल, लॉज यांच्या दरापेक्षा रेल्वेचे दर जास्त असल्याने त्यास हवा तितका प्रतिसाद मिळत नाही.तीनही रूम बुक करू शकतात. प्रवासी ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष गेल्यास एका कन्फर्म तिकिटावर तीन रुम बुक करू शकतो. एका खोलीत दोघेजण राहू शकतात.
रुम कशी बुक कराल
नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील रुम बुक करायची असल्यास BOOK आयआरसीटीसी रेट्रिग रुम ऑनलाइन साईटवर जाऊन बुक करता येते.त्याकरिता प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असायला हवे.तसेच प्रवासी प्रत्यक्षात गेल्यास देखील रुम मिळू शकते.मात्र,प्रत्यक्षापेक्षा ऑनलाईनला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
वातानुकूलित रुम दर आकारणी
नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील वातानुकूलित रुममध्ये तीन तासांसाठी ५८४ रुपये, सहा तासांसाठी ८०८ रुपये, नऊ तासांसाठी १ हजार ३२ रुपये, बारा तासांसाठी १ हजार ३६८, एका दिवसासाठी १ हजार ७०४ रुपये तर ४८ तासांकरिता ३ हजार ४०७ रुपये आकारले जातात. खाजगी हॉटेलपेक्षा हे दर अधिक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
वेटिंग रुममध्ये तासाला दहा रुपये
- नाशिकरोड स्थानकावर दोन नॉन एसी व दोन वातानुकूलित वेटिंग रूम आहेत.
- महिलांसाठी नॉन एसी व वातानु- कूलित एसी वेटिंग रूम मोफत आहे. पुरुषांसाठी नॉन एसी वेटिंग रूम मोफत आहे.
- पुरुषांसाठी असलेला वातानुकूलित एसी वेटिंग रूम ठेकेदाराला चालविण्यास दिला असून तेथे प्रवाशांकडून दर तासाला दहा रुपये भाडे आकारले जातात.
स्थानकावर प्रवाशांसाठी तीन वातानुकूलित रुम उपलब्ध आहेत. कन्फर्म तिकीट असल्यास ऑनलाइन व प्रत्यक्ष रूम बुकिंग केली जाऊ शकते. तसेच कॉमन डॉरमेट्री रूमचे नूतनीकरणाचे काम सुरु असून त्या ठिकाणी एकूण सहा बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.- आर. के. कुठार, नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रबंधक