आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्याला अटक करा
By admin | Published: July 14, 2017 01:23 AM2017-07-14T01:23:07+5:302017-07-14T01:23:07+5:30
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे महेश विक्रम हेगडे यांना तत्काळ अटक करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे महेश विक्रम हेगडे यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी काँग्रेसच्या शहर शाखेने पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे गुरुवारी केली. फेसबुकवर हा मजकूर टाकून गांधी यांची बदनामी करण्यामागे कोण आहे, याचाही शोध घ्यावा असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
इंदिरा गांधी यांच्याबाबत एका पुस्तकात वादग्रस्त मजकूर होता. भारतात या पुस्तकावर बंदी आहे. त्यातील वगळण्यात आलेला मजकूर हा आहे असे जाहीर करत फेसबुकवर हेगडे यांनी हा मजकूर टाकला. त्यावरून काँग्रेसमध्येच नाही तर सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे हेगडे यांना तत्काळ अटक करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व फेसबुकवरून तो मजकूर काढून टाकावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
बागवे यांच्यासमवेत या वेळी माजी महापौर कमल व्यवहारे, महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य गोपाळ तिवारी, युवक शाखेचे अध्यक्ष विकास लांडगे, प्रवक्ते म. वि. अकोलकर, नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, सोशल मीडिया सेल प्रमुख शंतनू माळशिखरे, मीरा शिंदे, जयकुमार ठोंबरे आदी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी याची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.