पाण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना मिळाल्या लाठया
By admin | Published: September 20, 2016 06:20 PM2016-09-20T18:20:27+5:302016-09-20T18:20:27+5:30
अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून तत्काळ पाणी सोडण्याच्या प्रमुख मागणीसाठी धुळे तालुक्यातील शेतकरी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले.
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २० : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून तत्काळ पाणी सोडण्याच्या प्रमुख मागणीसाठी धुळे तालुक्यातील शेतकरी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. तेथे त्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर तुफान दगडफेक केली. अखेर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार केला. या परिस्थितीमुळे कर्मचारी भेदरले आहेत. या दगडफेकीमुळे पोलीस, कर्मचारी व शेतकरी मिळून आठ ते दहा जण जखमी झाले आहेत.
धुळे तालुक्यातील भदाणे, खंडलाय खुर्द, खंडलाय बुद्रुक, बांबुर्ले, कावठी, मेहेरगाव, शिरधाने आदी गावांमधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी सकाळी अचानक मोर्चा काढला़ त्याबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, अशी माहिती मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशाद्वाराजवळच सुमारे ५०० ते ७०० शेतकऱ्यांनी ठाण मांडले होते़ अक्कलपाड्याच्या डाव्या कालव्यातून आता लगेच पाणी सोडा, अशी त्यांची मागणी होती.
त्यासाठी त्यांनी रेटा लावला होता. अशातच जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आल्यानंतर त्यांचे वाहन प्रवेशद्वाराजवळच अडविण्यात आले़ त्यानंतर चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेले़ त्यावेळी सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ हेही उपस्थित होते. चर्चा आटोपल्यानंतर माहिती देण्यासाठी अधिकारी येत असताना शेतकऱ्यांकडून आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली़
पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला़ विशेष म्हणजे मोर्चात कोणीही प्रमुख पदाधिकारी असे कोणीही नव्हते़ त्यामुळे कोणीच कोणाचे ऐकत नव्हते़ या दगडफेकीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फुटल्या़ तसेच दोन कर्मचाऱ्यांसह ४ ते ५ पोलीस आणि तेवढेच शेतकरी जखमी झाले आहेत़ जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेनंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना डाव्या कालव्याचा प्रश्न दहा दिवसांत मार्गी लावला जाईल. घडलेल्या प्रकारासंदर्भात पोलीस प्रशासन योग्य ती भूमिका बजावेल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रमुख अधिकारी उपस्थित होते.