द्यायचे पाच अन् घ्यायचे शंभर! इंधन स्वस्त तर धान्य महाग; जीएसटीमुळे आर्थिक भुर्दंड

By योगेश पिंगळे | Published: July 22, 2022 09:31 AM2022-07-22T09:31:03+5:302022-07-22T09:31:47+5:30

सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य भरडला जात असून, महागाईच्या खाईत लोटला गेल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

get five and take a hundred fuel is cheap but grain is expensive economic turmoil due to gst | द्यायचे पाच अन् घ्यायचे शंभर! इंधन स्वस्त तर धान्य महाग; जीएसटीमुळे आर्थिक भुर्दंड

द्यायचे पाच अन् घ्यायचे शंभर! इंधन स्वस्त तर धान्य महाग; जीएसटीमुळे आर्थिक भुर्दंड

googlenewsNext

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई : राज्य सरकारने पेट्रोलचे दर पाच रुपये तर डिझेलच्या दरात तीन रुपयांची कपात केली असल्याचा दिलासा दिला असला तरी एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे काहीतरी थोडे स्वस्त करून दिलासा दिल्याचे चित्र निर्माण केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांनी केला आहे. गॅस सिलिंडर महाग, अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी लावल्याने हा आर्थिक भुर्दंडदेखील सामान्यांना सोसावा लागणार आहे.

 इंधन दरांसह इतर जीवनावश्यक सर्वच क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे मागील सुमारे दोन वर्ष हातावर पोट अवलंबून असणाऱ्या अनेकांच्या हाताला काम नव्हते त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर जनजीवन हळूहळू सुरळीत होऊ लागले आहे. उत्पन्नात वाढ झालेलीच नसताना सातत्याने होणाऱ्या महागाईला तोंड देताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असल्याने माल वाहतुकीचे दरदेखील वाढले आहेत. गॅसचे दर वाढल्याने हॉटेलिंगदेखील महागले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी इंधनाच्या वाढलेल्या दरात पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांची कपात करून दिलासा दिला. परंतु, त्याच वेळी गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढविले आहेत. स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर प्रथमच पाच टक्के जीएसटी लादला आहे. दुग्धजन्य पदार्थ आणि चिवडा किंवा मुरमुरे यावरही पाच टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी

दैनंदिन जीवनातील मूलभूत गरज असलेल्या अन्नधान्यावर केंद्र सरकारने ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे.  यामध्ये अन्नधान्यावर प्रती किलो ५ ते ८ रुपये वाढणार आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.

सिलिंडर तब्बल ५० रुपयांनी महागला

आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली़ आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत १,०५३ रुपयांवर पोहचल्या असून वर्षभरात ही २४४ रुपयांची वाढ झाली आहे.

पेट्रोल ५, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

राज्यात सत्ताबदल होताच केंद्रातील भाजप सरकारच्या निर्देशानुसार राज्यात इंधनावरील करकपात करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

सर्वसामान्य महागाईच्या खाईत  

सातत्याने होणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य भरडला जात आहे. आता अन्नधान्यावरदेखील जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्यांवर अन्याय होणार असून शासनाने हा निर्णय मागे घेण्याची आवश्यकता आहे. - किशोर पवार, नागरिक

इंधन दरवाढ, गॅसचे दर वाढत आहेत तसेच प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली आहे परंतु नागरिकांच्या उत्पन्नात मात्र वाढ झालेली नाही. महागाई कमी करून सर्वच वजनावरील अन्नधान्यावर जीएसटी लावण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा. आणि नागरिकांना दिलासा द्यावा. - विजय पाटील, नागरिक
 

Web Title: get five and take a hundred fuel is cheap but grain is expensive economic turmoil due to gst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.