पुलाच्या प्रत्येक स्थितीची माहिती मिळणार
By admin | Published: July 18, 2016 02:15 AM2016-07-18T02:15:35+5:302016-07-18T02:15:35+5:30
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई मेट्रो वनच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पुलाच्या केबलला एसएचएमएस (स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग यंत्रणा) यंत्रणा बसवण्यात आली
मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई मेट्रो वनच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पुलाच्या केबलला एसएचएमएस (स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग यंत्रणा) यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे पुलाच्या प्रत्येक स्थितीची व हालचालींची इत्थंभूत माहिती मेट्रो प्रशासनाला मिळेल. मुंबईत अशी यंत्रणा प्रथमच बसवण्यात आली असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मुंबई मेट्रो तयार करताना वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मेट्रोकडून पूल बांधण्यात आला. मात्र या पुलाला कोणत्याही खांबाचा आधार न देता तो संपूर्णपणे एअर केबलद्वारे बांधण्यात आला. कोणत्याही आधाराशिवाय मेट्रोचा पूल असल्याने त्याच्या सुरक्षेसाठी मेट्रो प्रशासनाने एसएचएमएस ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. यात केबलला सेन्सर आणि अन्य यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पुलावर कायमस्वरूपी लक्ष ठेवतानाच त्याच्या प्रत्येक हालचालींची माहिती मेट्रोला मिळत जाईल. यात पूल किती व्हायब्रेट होत आहे, त्याला बसवण्यात आलेले नटबोल्ट व्यवस्थित आहेत की नाही, केबलला काही समस्या तर नाही ना, इत्यादी माहिती सेन्सरद्वारे देत राहील, असे मेट्रोच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)