घटना वाचविण्यास संघटित व्हा!
By Admin | Published: January 4, 2016 01:07 AM2016-01-04T01:07:51+5:302016-01-04T01:10:40+5:30
मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी येथे केले.येथील शेंडा पार्कच्या मैदानावर सेव्ह फेथ अॅण्ड कॉन्स्टिट्यूशन मूव्हमेंटअंतर्गत आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
कोल्हापूर : समानता मानणाऱ्या सर्वच धर्मांच्या विरोधात सध्या षड्यंत्र केले जात आहे. त्यामुळे संबंधित धर्मासह राज्यघटना धोक्यात आहे. धर्म, राज्यघटना वाचविण्यासाठी या पीडित धर्मीय, समुदायातील बांधवांनी संघटित व्हावे, असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी येथे केले.येथील शेंडा पार्कच्या मैदानावर सेव्ह फेथ अॅण्ड कॉन्स्टिट्यूशन मूव्हमेंटअंतर्गत आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ‘बहुजन समाज आणि अल्पसंख्याक समुदायामधील बुद्धिजिवी वर्गाची सामाजिक जबाबदारी व कर्तव्ये’ असा परिसंवादाचा विषय होता. आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, भारत मुक्ती मोर्चा, कॅथॉलिक बिशप कॉन्फरन्स् आॅफ इंडिया, विश्व लिंगायत महासभा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल सेंटरतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना सज्जाद नोमाणी, संयोजक मौलाना उमरैन रहमानी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक उपस्थित होते.
मेश्राम म्हणाले, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, लिंगायत, शीख, इस्लाम हे समानता मानणारे धर्म आहेत. त्यांच्याविरोधात जन्मावर आधारित श्रेष्ठत्व मानणाऱ्यांकडून षड्यंत्र केले जात आहे. शिक्षणाची पुनर्रचना करून तसेच बहुजन समाज, अल्पसंख्याक समुदायात फूट पाडून, वाद निर्माण करून ते आपला उद्देश साधून घेत आहेत. एस.सी., एन.टी., ओबीसी हे हिंदू नाहीत, त्यांच्यावर हा धर्म लादला आहे. एकूणच समानता मानणारे धर्म, समुदायांना संविधानाने दिलेले अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे धर्म, राज्यघटना वाचविण्यासाठी अशा पीडित धर्मियांनी संघटित होणे गरजेचे आहे शिवाय संघटित होऊन लढा उभारणे महत्त्वाचे आहे. यादृष्टीने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने चांगले पाऊल टाकले आहे. लढ्याच्या अनुषंगाने पाचशे जिल्ह्यांत भारत मुक्ती मोर्चातर्फे शंभर कार्यक्रम घेतले जातील. त्यात एस.सी., एस.टी., ओबीसींना सहभागी केले जाईल.
मुळीक म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेसाठी महापुरुषांचे विचार घेऊन कार्यरत राहणे आवश्यक आहे. बहुजन समाजातील बांधवांनी एकमेकांमधील वाद सोडून व मिटवून विकासासाठी एकत्र येणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सामाजिक सलोखा घट्ट करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. परिसंवादात मौलाना सज्जाद नोमाणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मौलाना महेफुजुर्रहमान फारुकी, डॉ. रफिक पारनेकर नगरसेवक भूपाल शेटे, लाला भोसले, आदींसह मुस्लिम समाजातील उच्चशिक्षित उपस्थित होते. मौलाना जुनैद यांनी सूत्रसंचालन केले. मुफ्ती मुज्जमील यांनी आभार मानले.