सातबारा उता-यासाठी मोबाईलवर ओटीपी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 08:22 PM2018-09-11T20:22:25+5:302018-09-11T20:30:05+5:30
राज्यातील शेतक-यांना डिजिटल उतारे देण्याची प्रक्रिया सुरू असून गेल्या १५ दिवसांपासून मोबाईलवर प्राप्त होणारा ओटीपी क्रमांक टाकून शेतकरी सातबारा उतारे डाऊनलोड करून घेत आहेत.
राहुल शिंदे
पुणे: राज्याच्या महसूल विभागातर्फे डिजिटल सातबारा उतारे देण्याच्या प्रक्रियेत काही धोरणात बदल करण्यात आले आहेत.त्यानुसार डिजिटल सातबारा उता-यासाठी मोबाईलवर प्राप्त होणारा ओटीपी क्रमांक संकेतस्थळावर द्यावा लागेल. तसेच संबंधित उतारा कोणत्या सक्षम अधिका-याने आणि कोणता तारखेला डिजिटली साईन करून दिला त्याचा ठळक उल्लेख या उता-यावर असणार आहे.
राज्याच्या महसूल विभागाने डिजिटल सातबारा उतारे तयार करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली असून आत्तापर्यंत सुमारे ४० लाख सातबारा उता-यांच्या डिजिटलायजेशनचे काम पूर्ण झाले आहे. डिजिटल उता-यासाठी सर्व्हरवरील स्पेस कमी पडत असल्याने महसूल विभागातर्फे हे काम थांबविण्यात आले आहे. मात्र,संगणकावर व मोबाईलवर सातबारा उतारे देण्याची प्रकिया सुरू आहे.भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा उता-याचे संकेतस्थळ आॅनलाईन पध्दतीने वापर करणा-यांची संख्या मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत एक हजार ७६५ एवढी होती. तसेच मंगळवारी या संकेतस्थळाला ९ हजार ६३६नागरिकांनी भेटी दिल्या असून ३ हजार ५३१ नागरिकांनी सातबारा उतारे डाऊनलोड करून घेतले आहेत. त्याचप्रमाणे या संकेतस्थळाला 1 मे 2018 पासून 17 लाख १६ हजार ६३५ नागरिकांनी भेट दिली असून आत्तापर्यंत ६ लाख ४४हजार ४३५ सातबारा उतारे डाऊनलोड करण्यात आले आहेत.
डिजिटल उतारे प्राप्त करण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते.त्यात संबंधित व्यक्तींच्या माहितीसह मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी भरावा लागतो.मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक संकेतस्थळावर टाकल्यानंतर डिजिटल सातबारा उतारे सहज प्राप्त होतात.पूर्वी डिजिटल सातबारा उता-यावर सक्षम अधिका-याचे नाव लहानशा अक्षरात लोगोवर छापले जात होते.परंतु,नवीन उता-यावर मोठ्या अक्षरात संबंधित अधिका-याचे नाव त्यााने कोणत्या तारखेला उतारा दिला,याचा उल्लेख करण्यात आला आहे.तसेच संबंधित उतारा वैध किंवा अवैध आहे.हे तपासण्यासाठी विशिष्ट क्रमांक दिलेला आहे.त्यामुळे उतारे मिळणे अधिक सुलभ झाले आहे,असा दावा भूमि अभिलेख कार्यालयातील अधिका-यांकडून केला जात आहे.
-----------------------------
राज्यातील शेतक-यांना डिजिटल उतारे देण्याची प्रक्रिया सुरू असून गेल्या १५ दिवसांपासून मोबाईलवर प्राप्त होणारा ओटीपी क्रमांक टाकून शेतकरी सातबारा उतारे डाऊनलोड करून घेत आहेत.तसेच या उता-यावर ‘डिजिटली साईन्ड’असा मोठ्या अक्षरात उल्लेख असेल.त्याचप्रमाणे उतारा देणा-या अधिका-याचे पूर्ण नाव असेल.सध्या ही सुविधा मोफत आहे.
-एस.चोक्कलिंगम,जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख ,महाराष्ट्र राज्य,