वेतनवाढ लवकर घ्या, पण नोकरी सोडू नका
By admin | Published: September 21, 2016 05:29 AM2016-09-21T05:29:58+5:302016-09-21T05:29:58+5:30
वेतन कमी मिळते म्हणून एसटी महामंडळाची नोकरी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे.
विलास गावंडे,
यवतमाळ- वेतन कमी मिळते म्हणून एसटी महामंडळाची नोकरी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी मनुष्यबळ अस्थिर होत आहे. शिवाय पदभरतीसाठी वारंवार प्रक्रिया राबवावी लागत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना आता दोन वर्षातच श्रेणीवाढ दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरतीअंतर्गत वर्ग-एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यामध्ये वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, यंत्र अभियंता आदी पदांचा समावेश असतो. या अधिकाऱ्यांना तीन वर्षेपर्यंत कनिष्ठ वेतनश्रेणी दिली जात होती. या वेतनश्रेणीत सहा ते आठ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. तीन वर्षेपर्यंत एवढ्या कमी वेतनात नोकरी परवडत नसल्याने अनेक जण नोकरी सोडून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर पर्याय म्हणून महामंडळाने अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा कालावधी दोन वर्षे केला आहे. दोन वर्षानंतर वेतनश्रेणी वाढताच चांगले वेतन मिळणार असल्याने अधिकारी नोकरी सोडून जाणार नाही, असे यामागचे धोरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>कामगारांमध्ये नाराजीचा सूर
महामंडळात नव्याने रुजू झालेले चालक, वाहक आणि यांत्रिक कामगारांनाही कमी वेतन मिळते. अधिकाऱ्यांसाठी वेतनश्रेणीचा कालावधी कमी करण्यात आला. कामगारांविषयी हा विचार का केला गेला नाही, असा प्रश्न कामगारांकडून विचारला जात आहे.
वेतनश्रेणी कालावधी ठरविताना महामंडळाने दुजाभाव केला आहे. कामगारांनाही कमी वेतनाचा फटका बसतो. सर्वांसाठी समान धोरण असावे.
- सचिन गिरी,
‘एसटी’ संघर्ष गु्रप, यवतमाळ