आनंद मिळवा, पण स्वत:ला सांभाळा
By Admin | Published: October 27, 2016 04:23 AM2016-10-27T04:23:34+5:302016-10-27T04:23:34+5:30
दिवाळीत उत्साह, आनंद आणि फटाक्यांच्या प्रकाशाने मुंबापुरी उजळून निघते. गेल्या काही वर्षांत शोभेच्या फटाक्यांची मागणी वाढली आहे. तथापि, दिवाळीत फोडले जाणारे
- पूजा दामले, मुंबई
दिवाळीत उत्साह, आनंद आणि फटाक्यांच्या प्रकाशाने मुंबापुरी उजळून निघते. गेल्या काही वर्षांत शोभेच्या फटाक्यांची मागणी वाढली आहे. तथापि, दिवाळीत फोडले जाणारे फटाकेच घातक ठरतात. ६ ते १२ वयोगटातील मुलांना फटाक्यांमुळे भाजणे, डोळ्याला इजा होणे अशा घटनांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ‘स्वत:ला सांभाळा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा’ असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दिवाळीत अनारामुळे भाजण्याचे प्रमाण अधिक आहे. १० पैकी ८ जणांचे हात हे अनारामुळे भाजलेले असतात. ६ ते १२ वयोगटातील मुले येतात, तेव्हा त्यांचे हात, चेहऱ्याचा काही भाग भाजलेला असतो. तर प्रौढ व्यक्तींमध्ये हात भाजण्याच्या केसेस अधिक असतात. कारण, प्रौढ व्यक्ती अनेकदा फटाके हातात धरून फोडतात. त्यामुळे अंदाज चुकल्यास फटाका हातात फुटून गंभीर जखमा होतात. दर दिवाळीत २० ते २५ गंभीर जखमी रुग्ण भाजल्यामुळे दाखल होतात. दिवाळीत अशा घटना घडल्यास आनंदावर विरजण पडते. थोडीशी काळजी घेतल्यास अशा घटना सहज टाळता येऊ शकतात, असे नॅशनल बर्न सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. सुनील केसवानी यांनी सांगितले.
अनार फुटल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनार लावताना लांब फुलबाजी वापरावी. लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या. रॉकेट घरात अथवा कपड्यांना लागल्यामुळे आगीच्या घटना घडतात. वेळीच लक्ष न गेल्यास गंभीर दुखापत होते. अनेकदा पणत्यांमुळे कपड्यांना आग लागते. हे टाळण्यासाठी पणत्या लांब आणि दिसतील अशा ठेवाव्यात. सिंथेटिक कपडे पटकन आग पकडत असल्याने असे कपडे घालून फटाके फोडू नयेत, असे डॉ. केसवानी यांनी स्पष्ट केले.
इजा झाल्यास
येथे संपर्क साधा...
दिवाळीत फटाके उडवताना लहान मुले भाजण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. अनेकदा भाजण्याचे प्रमाण अधिक नसते. पण योग्य ते उपचार त्वरित न मिळाल्याने गुंतागुंत वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे कोणतीही व्यक्ती फटाके फोडताना भाजली अथवा त्यांना फटाक्यामुळे इजा झाल्यास त्यांनी ०२२ - २७७९३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा. २४ तास या लाइनवर डॉक्टर उपलब्ध असतात. ते योग्य ते मार्गदर्शन करतात.
डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण अधिक
डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण अधिक आहे. दिवाळीत ५ ते ३५ रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. सुतळी बॉम्ब, अनार, फुलबाजी या फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होते. रंगीत फटाक्यांतील रंगाच्या कणांचा डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. लहान मुलांना भाजण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला.
भाजण्यावर पाणी हा प्रथमोपचार
फटाके फोडताना एखादी व्यक्ती भाजल्यावर तत्काळ भाजलेला भाग पाण्यात ठेवला पाहिजे. पाण्यात ठेवल्याने दाह कमी होतो आणि त्या व्यक्तीला बरे वाटते. त्याचबरोबरीने त्वचेला त्रास होत नाही. म्हणून भाजल्यावर फक्त त्या व्यक्तीला पाण्याचा प्रथमोपचार देणे आवश्यक असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्वचेलाही त्रास होत नाही. रुग्णालयात आणल्यावर त्या व्यक्तीच्या त्वचेवर उपचार करणे सहज शक्य होते.
भाजल्यावर हे करू नका...
अनेकदा लहान मूल अथवा प्रौढ व्यक्ती भाजल्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी अन्य व्यक्ती तत्परतेने तयार असतात. या व्यक्ती भाजलेल्या व्यक्तीला विविध प्रकारे उपचार करण्यासाठी हळद, शाई अथवा अन्य कोणत्याही गोष्टी वापरतात.
मात्र, भाजलेल्या ठिकाणी अशी कोणतीही गोष्ट लावणे चुकीचे आहे. अशा उपचारांमुळे व्यक्तीला रुग्णालयात आणल्यावर उपचार सुरू केल्यावर अथवा क्रीम लावल्यावर त्यावर त्याचा हवा तसा उपयोग होत नाही.
डोळ्यावर कोणताही प्रथमोपचार नको!
फटाके उडवताना अनेकदा डोळ्याला इजा होते. काही वेळा माती अथवा फटाक्यातील दारू डोळ्यात उडते. असा अपघात झाल्यास त्यावर कोणताही प्राथमिक उपचार करू नये. डोळा पाण्याने धुऊ नये. अनेकदा डोळा पाण्याने धुताना डोळ्याला अधिक इजा होऊ शकते. त्यामुळे डोळ्याला इजा झाल्यास तत्काळ जवळच्या नेत्रचिकित्सकाकडे जाऊन डोळ्याची तपासणी करून घ्यावी. औषधांच्या दुकानातून स्वत:च्या मनाने अथवा केमिस्टच्या सल्ल्याने डोळ्यात ड्रॉप टाकू नयेत.
दिवाळी हा दिव्यांचा म्हणजेच प्रकाशाचा सण आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करताना डोळ्यांना इजा व्हायला देऊ नका. या दिव्यांच्या सणाला स्वत:च्या दृष्टीची काळजी विशेषकरून घ्या. फटाके उडवताना लांब उभे राहा. मातीत अथवा वाळूत पुरून फटाके उडवू नका, अशा प्रकारांनी डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक असतो. डोळ्याला इजा झाल्यावर तत्काळ डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. कारण, २४ तासांत शस्त्रक्रिया झाल्यास त्याचा अधिक फायदा होतो आणि अधिक इजा होण्याचा धोका टळतो. रंगाचे फटाके उडवतानाही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना एकटे फटाके फोडायला पाठवू नका.
- डॉ. तात्याराव लहाने,
अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय