सकारात्मक ऊर्जा मिळवा
By admin | Published: February 12, 2017 12:31 AM2017-02-12T00:31:03+5:302017-02-12T00:31:03+5:30
नीला सत्यनारायण : आंतरभारती शिक्षण मंडळातर्फे कांचन परुळेकर यांना ‘कुुसुम पुरस्कार’
कोल्हापूर : प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आणि दु:खे असतात. त्यामुळे हे सगळं माझ्यासोबत का घडतंय असा विचार न करता घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींतून सकारात्मक ऊर्जा मिळवा, चौकटीबाहेर जाऊन प्रश्नांचा विचार करा. त्यातूनच उत्तरं मिळत जातात. जगण्याचा दृष्टिकोन बदलतो, असा कानमंत्र माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महिलांना दिला.
शाहू स्मारक भवन येथे शनिवारी आंतरभारती शिक्षण मंडळाच्यावतीने कांचन परुळेकर यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुचेता कोरगावकर होत्या. रोख रुपये २५ हजार, शाल, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यासपीठावर सुचेता पडळकर, विनय पाटगावकर, पल्लवी कोरगावकर, तनुजा शिपूरकर, एम. एस. पाटोळे उपस्थित होते.
नीला सत्यनारायण यांनी आपल्या कथांच्या माध्यमातून उपस्थित महिलांना जगण्याचा मूलमंत्र दिला. त्या म्हणाल्या, गृहिणी असलेल्या महिलांना बऱ्याच वेळा न्यूनगंड असतो. मात्र, स्त्रीने कुटुंबाचा सांभाळ करण्यास नकार दिला तर कुटुंब विस्कळीत होते.
कांचन परुळेकर म्हणाल्या, महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर काढून त्यांच्या शक्तीचा वापर कुटुंबाच्या, समाजाच्या कल्याणासाठी करीत ‘स्वयंसिद्धा’ने त्यांना आत्मनिर्भर केले आहे. महिलांना राजकारणात आरक्षण मिळाले असले तरी ‘वहिनीसाहेबां’च्या वतीने ‘साहेब’च कारभार करतात. त्यामुळे महिलांना राजकीयदृष्ट्या साक्षर करणे गरजेचे आहे. सुचेता कोरगावकर यांनी समारोप केला. तनुजा शिपूरकर यांनी प्रास्ताविक, इंद्रायणी पाटील यांनी सूत्रसंचालन, तर एम. एस. पाटोळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे शनिवारी नीला सत्यनारायण यांच्या हस्ते कांचन परुळेकर यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी सुचेता पडळकर, विनय पाटगावकर, सुचेता कोरगावकर, पल्लवी कोरगावकर, तनुजा शिपूरकर, एम. एस. पाटोळे उपस्थित होते.