सुरुंच्या बागा केल्या बकाल
By admin | Published: November 4, 2016 03:11 AM2016-11-04T03:11:01+5:302016-11-04T03:11:01+5:30
मागील आठवडाभर दिवाळीनिमित्त डहाणू आणि बोर्डीतील समुद्रकिनारा आणि सुरूंच्या बागा पर्यटकांनी गजबजल्या होत्या.
अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- मागील आठवडाभर दिवाळीनिमित्त डहाणू आणि बोर्डीतील समुद्रकिनारा आणि सुरूंच्या बागा पर्यटकांनी गजबजल्या होत्या. दरम्यान काही अविवेकी पर्यटकांच्या वर्तणूकीने सुरू बागा बकाल बनल्या आहेत. पर्यटकांच्या गैरवर्तणूकीला आळा घालण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
दिवाळीनिमित्त डहाणू आणि बोर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात परगावातील पर्यटक दाखल झाले होते. या पर्यटन स्थळी बोटिंग, पॅराग्लायिडंग, बनाना रायडिंग आदि. सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र निसर्गाने मुक्त उधळण केल्याने मागील आठवड्यापासून पर्यटकांचा ओघ वाढता होता. या वेळी पर्यटकांनी समुद्री पर्यटनासह हिरव्या गार सुरू बनात निसर्गाचा मनमुराद आस्वाद लुटला. मात्र काही अविवेकी पर्यटकांनी सुरू बागांमध्ये चूल पेटवून अन्न पदार्थ शिजवले, खाद्य पदार्थांचे अवशेष, प्लॅस्टिक पिशव्या, मद्याच्या बाटल्या उघड्यावर फेकल्याने अस्वच्छता पसरली आहे. शिवाय मद्याच्या रिकाम्या बाटल्या झाडांच्या बुंद्यांवर आदळून फोडल्याने सर्वत्र काचांचे तुकडे पसरल्याने चालणेही धोकादायक बनले आहे. चुलीसाठी जाळ म्हणून बागेतील लाकडे वापरल्याने झाडांना इजा पोहचली आहे. एकंदरीत सुरू बागांना बकाल स्वरूप येऊन जैवविविधतेला धोका पोहचतो आहे.
>नागरीकांनी केलेल्या वनीकरणाचा सत्यानाश?
नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रकिनारी ताड बियांचे रोपण करून हरीतपट्टा वाढविण्यास मोलाचे योगदान दिले आहे. मात्र पर्यटन विकासाच्या नावाखाली खेळणी, बैठक व्यवस्था, अनधिकृत विद्युत रोषणाई आणि पेव्हर ब्लॉकचा जॉगिंग ट्रक उभारण्याचा घाट वन विभागाने घातला आहे.
राज्याचे वनमंत्री नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन करतात आणि दुसऱ्या बाजूला स्थानिकांनी संवर्धनाने वाढवलेली वनसंपदा नष्ट करण्याचा घाट डहाणू वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घालीत आहेत. त्यामुळे वनमंत्र्या प्रमाणेच डहाणू पर्यावरण प्राधिकरणाला लिखित निवेदन दिले जाणार आहे. सुरुंच्या बागांना हानी पोहचू देणार नाही. प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात येईल.’’
- कुंदन राऊत
(पर्यावरणप्रेमी, डहाणू)