विद्यापीठाच्या परवानगीशिवाय अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 06:18 AM2020-08-01T06:18:12+5:302020-08-01T06:18:24+5:30
विद्यार्थ्यांचा आरोप; सोमैया खासगी विद्यापीठात हेच अभ्यासक्रम दुप्पट शुल्क घेऊन केले सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडे अभ्यासक्रम बंद करण्याची प्रक्रिया चालू असताना, पूर्ण परवानग्या नसताना सोमैया महाविद्यालयाकडून स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातल्याचा ओराप मनविसेसह विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.
मुंबई विद्यापीठाला संलग्नित सोमैय्या विद्याविहार महाविद्यालयात स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना तेथील अभ्यासक्रम अचानक बंद करण्यात आले. त्याऐवजी नव्यानेच मान्यता मिळालेल्या सोमैय्या खासगी विद्यापीठात हे अभ्यासक्रम दुप्पट शुल्क घेऊन सुरू करण्यात आले आहेत. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, प्रक्रिया पार न पाडता नियमित महाविद्यालयांतील अभ्यासक्रम बंद करणाºया या महाविद्यालयाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे.
२० ते ३० हजारांत प्रवेश होणाºया अभ्यासक्रमासाठी ७० हजार ते १ लाखापर्यंत शुल्क मोजण्याचा पर्याय दिला जात आहे. अल्पसंख्याक, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी हे असंवैधानिक असल्याचे मत मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी व्यक्त केले. दरम्यान, सोमैयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
स्थानिक समितीकडून पुढील कार्यवाही
विद्यापीठाकडे सोमैय्या महाविद्यालयाकडून काही अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव आला आहे. मात्र विद्यापीठाकडून पुढील कार्यवाही किंवा ते बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले नाहीत. या महाविद्यालयातील अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मागणी पाहता ते तात्काळ बंद करता येणार नाहीत. विद्यापीठाच्या स्थानिक समितीकडून पुढील कार्यवाही होईल. या दरम्यान महाविद्यालयाकडून अभ्यासक्रम बंद केल्यास योग्य ती कारवाई होईल.
- दीपक वसावे, उपकुलसचिव, मुंबई विद्यापीठ
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क
हिरावून घेण्याचा प्रयत्न
सोमैय्या महाविद्यालयांत प्रवेश घेणारे विद्यार्थी हे मध्यम वर्गापासून ते दुर्बल घटकांपर्यंत आहेत. कमी शुल्कातील अभ्यासक्रम बंद करून त्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जात आहे. अभ्यासक्रम पुन्हा सुरू न केल्यास सोमैया खासगी विद्यापीठ बंद करण्याची मागणी आम्ही राज्य व केंद्राकडे करू.
- संतोष गांगुर्डे, राज्य उपाध्यक्ष, मनविसे