हिंदुस्थान व्यायामशाळा हलविण्याचा घाट
By admin | Published: July 12, 2017 02:59 AM2017-07-12T02:59:22+5:302017-07-12T02:59:41+5:30
हिंदुस्थान व्यायामशाळा ही नगरपरिषदेच्या असेंब्ली हॉल सभागृहात हलविण्याचा घाट घातला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : हुतात्मा भाई कोतवाल यांची माथेरान ही जन्म आणि कर्मभूमी. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी स्थापन केलेली हिंदुस्थान व्यायामशाळा ही नगरपरिषदेच्या असेंब्ली हॉल सभागृहात हलविण्याचा घाट घातला आहे. बुधवारी १२ जुलै रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण पत्रिकेवर हा विषय आल्याने हेतूबद्दल शंका निर्माण झाली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात बलशाली युवा पिढी घडविण्यासाठी हुतात्मा भाई कोतवाल यांनी हिंदुस्थान व्यायाम मंडळाची स्थापना केली. माथेरान बाजारपेठेत मुख्य रस्त्याला लागून या व्यायामशाळेची इमारत आहे. या इमारतीला जवळच बेजेनजी चिनॉय असेंब्ली हॉलची इमारत आहे. माथेरान हेरिटेज यादीत ग्रेड-३मध्ये या इमारतीचा समावेश असून, जागेची मालकी सेक्रेटरी हिंदुस्तान व्यायाम मंडळ या नावाने आहे. या इमारतीसमोरील मोकळी जागा स्थानिक सार्वजनिक कार्यक्र मांसाठी वापरली जाते. असेंब्ली हॉलही हेरिटेज ग्रेड-३मध्ये समावेश आहे. हिंदुस्थान व्यायामशाळा स्वत:च्या इमारतीमधून असेंब्ली हॉल इमारतीमध्ये हलविण्याचा धूर्त डाव असल्याची चर्चा आहे.
हिंदुस्थान व्यायाम मंडळाचा कारभार पाहण्यासाठी विश्वस्त मंडळ होते. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेशिवाय या संदर्भातील कोणताही निर्णय घेणे उचित होणार नाही. यापूर्वी अनेकदा या व्यायामशाळेची दुरवस्था झाली होती. त्या वेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी स्वखर्चाने या व्यायामशाळेची दुरु स्ती करून दिली तर स्वाभिमानचे अध्यक्ष नीतेश राणे यांच्या माध्यमातून व्यायामशाळेसाठी अत्याधुनिक साहित्य देण्यात आले होते. नगरपरिषदेने या व्यायामशाळेच्या दुरु स्तीसाठी दहा लाख रु पयांची तरतूद यापूर्वीच केली आहे, असे असताना त्याची अंमलबजावणी करायची सोडून व्यायामशाळा हलविण्याचा निर्णय नगरपरिषदेने तयार केलेल्या हेरिटेज नियमावलीला छेद देणारा ठरणार आहे. या संदर्भात माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
स्थानिक नागरिकांना अत्यंत वाजवी दरात असेंब्ली हॉल उपलब्ध होतो. व्यायामशाळा तेथे हलविल्यास नागरिक एका हक्काच्या सभागृहास मुकणार असून, या निर्णयामुळे रिक्त होणाऱ्या हिंदुस्थान व्यायाम मंडळाच्या जागेचा अन्य कारणांसाठी बेकायदा गैरवापर होण्याची शक्यता आहे. याऐवजी नगरपरिषदेने यापूर्वीच्या आर्थिक तरतुदींचा वापर करून आहे त्या जागेत व्यायामशाळा अद्ययावत करावी.
- शिवाजी शिंदे, विरोधी पक्षनेता, नगरपरिषद, माथेरान
>बहुमताच्या जोरावर माथेरानचा ऐतिहासिक वारसा पुसण्याचे काम या निर्णयामुळे होणार आहे. ज्या व्यायामशाळेची मालकी नगरपरिषदेची नाही त्याबाबतीत असा निर्णय कसा घेतला जाऊ शकतो? कोणत्याही पद्धतीने माथेरानच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल.
- मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष माथेरान