घाटकोपर इमारत दुर्घटना : माझे हात कापा, पण मला वाचवा... मृत्यूशी तिनं दिली झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 02:39 PM2017-07-27T14:39:33+5:302017-07-27T14:58:37+5:30
घाटकोपर पश्चिमेकडील साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेले मदतकार्य बुधवारी (26 जुलै) संध्याकाळी थांबवण्यात आले. या दुर्घटनेनंतर शोधमोहीमेदरम्यान मन सुन्न करणा-या घटना समोर आल्या आहेत. त्यातील एक कहाणी आहे प्रज्ञा जडेजा यांची..
घाटकोपर, दि. 27 - घाटकोपर पश्चिमेकडील साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेले मदतकार्य बुधवारी (26 जुलै) संध्याकाळी थांबवण्यात आले. या दुर्घटनेनंतर शोधमोहीमेदरम्यान मन सुन्न करणा-या घटना समोर आल्या आहेत. त्यातील एक कहाणी आहे प्रज्ञा जडेजा यांची... ''माझे दोन्ही हात कापून टाका, पण मला या ढिगा-यातून बाहेर काढा'', असे मनात धस्स करणारे वाक्य शोधमोहीमेदरम्यान एनडीआरएफच्या जवानांच्या कानी पडले. हृदय पिळवटून टाकणारा तो आवाज होता 50 वर्षीय प्रज्ञा जडेजा यांचा. ढिगा-याखाली अडकलेल्या प्रज्ञा जडेजा यांना वेदना असह्य होत होत्या. जीवाच्या आकांताने त्या बचावपथकाला म्हणत होत्या की,'' भाऊ माझे दोन्ही हात कापा, पण मला लवकर बाहेर काढा... नाही तर माझा जीव जाईल''.
दुर्घटनेतून बचावलेल्या 11 जणांपैकी प्रज्ञा या एक आहेत, ज्यांना साईदर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या कोसळलेल्या चार मजली इमारतीच्या ढिगा-याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही इमारती मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती. या घटनेत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. कॉन्स्टेबल संतोष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, खूप कठीण परिस्थितीत आम्ही ढिगा-याखालील शोधमोहीम केली. प्रज्ञा यांचे दोन्ही हात कोसळलेल्या दोन मोठ्या भिंतींखाली अडकले होते, मात्र आम्ही त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होतो व अथक प्रयत्नांनंतर तो ढिगारा बाजूला काढण्यात आम्हाला यश आले आणि प्रज्ञा यांना आम्ही सुरक्षित बाहेर काढले. याच पद्धतीनं 20 वर्षीय तरुणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून बचावपथकानं तिलाही सुरक्षितरित्या बाहेर काढले. एका अन्य प्रशासकीय कर्मचा-याने दिलेल्या माहितीनुसार, ढिगा-याखाली अडकलेली ही तरुणी वेदनेमुळे कण्हत होती. या तरुणीला वाचवताना अक्षरशः आम्ही प्रार्थना करत होतो की ढिगारा बाजूला सारताना मोठे-मोठे खांब तिच्या अंगावर पडू नयेत आणि अशा पद्धतीनं आम्ही तिला ढिगा-याबाहेर काढले.
इमारत कोसळल्यानंतर तातडीनं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांचं पथक बचावमोहीमेसाठी दाखल झाले. या दुर्घटनेतून बचावलेल्या राजेश दोशी (वय ५७) यांची कहाणीदेखील डोळ्यात पाणी आणणारी आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले राजेश दोशी (वय ५७) यांनी मुलगा दर्शनला फोन करुन सांगितले की, मी श्वास घेऊ शकतो पण मला जागेवरून हलता येत नाही. ढिगाऱ्याखाली माझा पाय अडकला आहे, असं त्यांनी सांगितले. दर्शननं याबाबत बचावपथकाला माहिती दिली. यानंतर तब्बल 15 तासांनी राजेश यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मंगळवारी घाटकोपरमधील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळली आणि एका क्षणात होत्याचं नव्हते झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.