"स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही..."; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:43 IST2024-12-08T13:41:38+5:302024-12-08T13:43:31+5:30
ज्यांना पराभव जिव्हारी लागतो तोच उद्या इतिहास घडवू शकतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही..."; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला
मुंबई - तुमच्यासारखे कार्यकर्ते मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही. पराभव ज्यांच्या जिव्हारी लागतो तोच इतिहास घडवू शकतो. तुम्ही ज्या पक्षातून आलात त्याला ना हेतू आहे ना दिशा असं भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसे प्रमुख राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. घाटकोपर येथील मनसे कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला.
या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे एक है तो सेफ है..आता हाच प्रश्न मला मराठी माणसांना विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? शहरात असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपल्या हक्काची मुंबई डोळ्यादेखत ओरबडून नेली जातेय अशावेळी आपण षंढ म्हणून बघत बसणार का? तुम्ही कोणत्या पक्षातून आलात त्याबद्दल मला बोलायचं नाही पण पक्ष स्थापन केल्यापासून पक्षाला काही हेतू लागतो. दिशा लागते ती काहीच नाही. अशावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात. त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही असा निशाणा त्यांनी मनसेवर साधला.
तसेच १५ दिवसांपूर्वीच निकाल लागलाय, निकाल लागल्यानंतर तुम्ही शिवसेनेत येताय. जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही तुम्ही इथं जल्लोषात प्रवेश करताय. जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाही म्हणजेच त्या विजयात काहीतरी घपला आहे. बरेच घोटाळे आहेत. तुम्ही सगळे एकत्र आलात ते योग्य वेळी आला. जिंकल्यानंतर सगळे येतात पण हरल्यानंतर कुणी येत नाही. ज्यांना पराभवाची खंत असते. ज्यांना पराभव जिव्हारी लागतो तोच उद्या इतिहास घडवू शकतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात. मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला दुसऱ्या कुणाला देण्याचा अधिकार नाही हे मी उघडपणे तेव्हाही सांगितले आजही सांगतोय. फक्त निशाणी बदललीय. निशाणी बदलल्यानंतरही आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत होतो तेव्हा सर्वजण म्हणायचे उद्धवजी, तुम्हीच येणार. जे काही सर्व्हे सुरू होते त्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण होता, मग त्याची दांडी कशी उडाली असं उद्धव ठाकरेंनी विचारले.
दरम्यान, हे सगळे चोरांचे, दरोडेखोरांचे राज्य आहे ते उलथावून टाकावेच लागेल. ठिणगी पडली आहे. आता तुम्हाला झोपून चालणार नाही कारण आता मुंबईतील मराठी माणसांचा, महाराष्ट्र धर्माचा आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि योग्यवेळी तुम्ही शिवसेनेची मशाल आणि भगवा हाती घेतला आहे. तुम्हाला जी काही मदत लागेल, जिथे आमदारांची मदत लागेल तुम्ही ताकदीने येऊन सांगा. तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला.