गोराई बुडाली; नाल्यात भरणी
By admin | Published: August 6, 2016 01:31 AM2016-08-06T01:31:59+5:302016-08-06T01:31:59+5:30
शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे शहरासह उपनगरातील सखल भागात पाणी साचले असतानाच बोरीवलीतल्या गोराईमधील काही भागात पाणी साचले
गौरी टेंबकर-कलगुटकर,
मुंबई- शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे शहरासह उपनगरातील सखल भागात पाणी साचले असतानाच बोरीवलीतल्या गोराईमधील काही भागात पाणी साचले होते. येथील गाळात बुडालेली पोकलेन काढण्यासाठी महापालिकेने नाल्यातच ट्रकभर भरणी टाकल्याने येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
गोराई गावातील मोठ्या नाल्यातील गाळ काढण्याचे कंत्राट पालिकेने एम.डी. ब्रदर्स या कंपनीला दिले होते. मात्र ही सफाई योग्य प्रकारे झाली नाही. याबाबतची तक्रार आर-मध्य विभागाचे उप-अभियंता व पेंटर एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर एस.डब्ल्यू.डी. प्लॅनिंग यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र ही तक्रार महापालिकेने गांभीर्याने घेतली नाही. दरम्यान, नाल्यातील गाळ काढण्यासाठी येथे एक जेसीबी आणण्यात आला. याचा चालक प्रशिक्षित नसल्याने जेसीबी गाळात अडकला.
हा जेसीबी काढण्यासाठी कंत्राटदाराने नाल्यातच पन्नास ट्रक भरणी टाकली. हा जेसीबी गाळातून काढल्यानंतर टाकण्यात आलेली भरणी काढण्याची तसदी कंत्राटदाराने घेतली नाही. परिणामी शुक्रवारी झालेल्या पावसामुळे गोराई परिसरातील सर्व घरांत पाणी शिरले. जवळपास चार तास हे पाणी साचले. त्यामुळे स्थानिकांचे मोठे
नुकसान झाले, अशी माहिती
स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी यांनी दिली.
>लिंक रोडच्या धर्मानगर, जुनी एम.एच.बी. कॉलनी येथे पाणी वाहून नेणारा नाला आहे. हा नाला वळवण्यात आला. त्याचा फायदा स्थानिक विकासकांनी घेत त्यात भरणी टाकली.
परिणामी साचलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही आणि स्थानिकांच्या घरात पाणी शिरले.