घुग्गुस ठरले महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण; सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 06:11 AM2022-03-30T06:11:18+5:302022-03-30T06:11:36+5:30
प्रदूषणामुळे स्थानिक अनेक आजारांच्या विळख्यात
- आशिष राॅय
नागपूर : एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी)च्या २०१८-१९च्या अहवालानुसार चंद्रपूरजवळील घुग्गुस हे महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण असल्याचे आढळून आले आहे. या अहवालानंतर सरकारला उपाययोजना करण्यासाठी जाग येईल, असे वाटले; परंतु स्थानिकांची घोर निराशा झाली. वायू प्रदूषणामुळे लाेक माशांसारखे मरत असताना जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गाढ झोपेत आहेत.
टेरीच्या अहवालानुसार रिस्पायबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर (आरएसपीएम)ची सरासरी पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या कमाल मर्यादेच्या तिप्पट आहे. ६० मायक्राेग्रॅम/ घनमीटर या मर्यादेच्या तुलनेत २०१८-१९ मध्ये ते १७५ म्युग्रॅम्/ घनमीटर एवढे हाेते. २०१७-१८ मध्ये ते २९८ म्युग्रॅम/ घनमीटरपर्यंत वाढले हाेते. आरएसपीएमच्या उच्च पातळीमुळे घुग्गुसचे रहिवासी हृदयविकाराच्या झटक्याने मरत आहेत. बहुतेकांना किडनी, स्तन, फुप्फुस, हृदय, डोळे आणि त्वचेच्या आजारांनी ग्रासले आहे. उदरनिर्वाहासाठी शहरात राहण्यास भाग पडलेल्या अनेकांनी आपली कुटुंबे नागपूर किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित केली असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते अमित बोरकर यांनी सांगितले.
घुग्गुसचे डॉ. प्रदीप यादव यांच्या मते, शहरात त्वचेची ॲलर्जी, दमा आणि हृदयाचे आजार भयंकर वाढले आहेत. येथे सेट्रिझीन या अँटी-एलर्जिक औषधाची विक्री खूप जास्त आहे. घुग्गुसमध्ये स्पंज आयर्न, सिमेंट आणि कोळसा यांचा घातक संयोग आहे. लॉयड्स मेटलचा स्पंज आयर्न प्लांट, एसीसीचा सिमेंट प्लांट आणि डब्ल्यूसीएलच्या कोळशाच्या खाणी शहराजवळ आहेत. स्पंज आयर्न प्लांट्स हे सर्वात प्रदूषित उद्योगांपैकी एक असून, अनेक देश आणि भारतीय राज्यांनी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. घुग्गुसमध्ये मात्र हे उद्याेग हवेत मुक्तपणे विष टाकत आहेत.
गेल्या ३० वर्षांपासून प्रदूषणाविरुद्ध लढा देणारे पर्यावरण कार्यकर्ते विनेश कलवाल यांनी सांगितले की, लॉयड्स प्लांटमधून लोहाचे बारीक कण हवेत उत्सर्जित हाेतात व मानवी फुप्फुसात स्थिरावत रक्तप्रवाहात प्रवेश करतात. तिशीतले तरुण हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त झाले आहेत, तर २० वर्षांच्या तरुणांना कर्करोग होत आहे. घुग्गुसमधील प्रत्येक तिसऱ्या घरात कर्करोगाचा रुग्ण असून, लवकरच प्रत्येक घरात एक रुग्ण असेल.
प्रदूषणाचे परिणाम
नायट्राेजन ऑक्साईड
श्वसन प्रणालीवर परिणाम
वनस्पतींच्या वाढीला अडथळा
आम्ल वर्षा
जलस्त्रोतांचे प्रदूषण
सल्फर डायऑक्साईड
श्वसनाचे आजार
डाेळ्यांची जळजळ
वनस्पतींवर परिणाम
आरएसपीएम
अवेळी मृत्यू
श्वसनाचे तीव्र आजार
वनस्पतींच्या वाढीवर परिणाम
२०१८-१९ मध्ये प्रदूषणाचा स्तर
एसओटू एनओएक्स आरएसपीएम
मर्यादा ५० ४० ६०
घुग्गुसमध्ये स्तर ४ २९ १७५