गुलाम अली फक्त चर्चेपुरते?
By Admin | Published: January 19, 2016 02:10 AM2016-01-19T02:10:45+5:302016-01-19T02:10:45+5:30
पक्षातून डावलले जात असल्याने आणि गेले काही दिवस प्रसिद्धीपासून दूर गेलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गझलकार गुलाम अली यांचा
ठाणे : पक्षातून डावलले जात असल्याने आणि गेले काही दिवस प्रसिद्धीपासून दूर गेलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गझलकार गुलाम अली यांचा कार्यक्रम ठाण्यात घेण्याचे टिष्ट्वट करून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने कार्यक्रमाला विरोध केला असला, तरी भाजपाला मात्र गरज पडली तर संरक्षण देण्याची भूमिका घ्यावी लागली आहे.
ठाण्यातील पालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीतील दोन्ही पक्षांत या मुद्द्यावरून फूट पाडण्याची आव्हाड यांची खेळी तूर्त तरी यशस्वी झाली असली तरी गुलाम अली यांना खरोखरीच निमंत्रण दिले आहे की, चर्चा घडविण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करण्यात आला, हे गुलदस्त्यात आहे. भाजपामधील हिंदुत्ववाद्यांनी मात्र शिवसेनेची री ओढत या कार्यक्रमाला विरोध केला असून एवढ्या वर्षांत कार्यक्रम करीत असूनही आव्हाड यांना आताच गुलाम अली का आठवले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कळव्यात आव्हाडांच्या संघर्ष संस्थेतर्फे १९ फेबु्रवारीला ठाणे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यात गुलाम अली यांना आणण्याचे टिष्ट्वट त्यांनी रविवारी केले. त्यातून अपेक्षेनुसार वादाची ठिणगी पडली.
मुंबईत शिवसेनेने अली यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. तशीच भूमिका त्यांनी या कार्यक्रमाबाबतही घेतली. गृह खाते ताब्यात असलेल्या भाजपाला मात्र आव्हाडांना संरक्षण हवे असेल आणि राज्य सरकारकडे त्यांनी ते मागितले तर ते नक्कीच पुरवू, असा दावा ठाणे शहर भाजपाने केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना यानिमित्ताने पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले.
या कार्यक्रमाच्या घोषणेनिमित्ताने बऱ्याच काळानंतर चर्चेत येण्याचा आव्हाड यांचा हेतू मात्र साध्य झाला. बिल्डर परमार आत्महत्या प्रकरणामुळे गेले काही दिवस त्यांच्यासह पक्षातील त्याच्या गटातील नगरसेवक बचावाच्या पवित्र्यात होते. वरिष्ठांकडून साथ मिळत नसल्याचे सांगत त्या नगरसेवकांनी थेट पक्ष सोडण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्याबाबत मंगळवारी पक्षाने बैठक बोलावली आहे.
नेहमी स्टंट करून चर्चेत राहण्याची सवय असल्याने आव्हाड यांनी पुन्हा तशीच खेळी केल्याचे सांगितले जाते. वरिष्ठांचीही त्यांच्यावर वक्रदृष्टी झाल्याने कदाचित पुन्हा केंद्रस्थानी येण्यासाठी आणि आपल्या मतदारांची नाळ अधिक घट्ट बांधण्यासाठी त्यांनी हा अट्टहास केल्याची चर्चा मुंब्रा परिसरात रंगू लागली आहे.
गेली १० ते १५ वर्षे आव्हाड विविध कार्यक्रम घेत असतांना आताच त्यांना गुलाम अली यांचा कार्यक्रम घेण्याचे का आठवले, असा सवाल भाजपामधील हिंदुत्ववादी गटाने उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)