गुलाम अलींचा ठाण्यात कार्यक्रम
By Admin | Published: January 18, 2016 03:15 AM2016-01-18T03:15:36+5:302016-01-18T03:15:36+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष संस्थेच्या वतीने फेब्रुवारीत होणाऱ्या ठाणे महोत्सवात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांची मैफल होणार असल्याचे
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष संस्थेच्या वतीने फेब्रुवारीत होणाऱ्या ठाणे महोत्सवात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांची मैफल होणार असल्याचे टिष्ट्वट आव्हाड यांनी रविवारी केले. कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला असल्याने गुलाम अलींवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खारीगाव-पारसिकनगर येथील ९५ फूट मार्गावर ‘ठाणे आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. याच ठाणे महोत्सवात गुलाम अली यांची मैफल होणार असल्याचे आमदार आव्हाड यांनी टिष्ट्वटरवरून जाहीर केले. आपण गुलाम अली यांना आमंत्रण दिले असून, त्यांनी ते स्वीकारले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आव्हाड यांना ‘गुलाम अलींचा कार्यक्रम आयोजित करण्याची हिंमत त्यांनी दाखवावीच,’ असे आव्हान दिले आहे. आव्हाडांचा कार्यक्रम उधळून लावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवसेनेचा गुलाम अली यांना असलेला विरोध माहीत असतानाही त्यांच्या मैफलीचे आयोजन करण्याची घोषणा करणे हा आव्हाड यांचा प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीकाही सरनाईक यांनी केली. आव्हाड यांना ठाणेकरांचे मनोरंजन करण्याकरिता मैफल आयोजित करायचीच असेल तर भारतात गझल गायक नाहीत का, असा सवाल सरनाईकांनी केला.
शिवसेनेने अलीकडेच गुलाम अली यांची मैफल आयोजकांना दमदाटी करून रद्द करण्यास भाग पाडले होते. पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याचे आयोजन करणारे सुधींद्र कुळकर्णी यांच्यावर शिवसैनिकांनी शाईफेक केली होती.