दुबईकरांना भावली महाराष्ट्राची स्पेशल केळी! भारतानं केली तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:51 PM2021-06-16T17:51:55+5:302021-06-16T17:52:32+5:30
जगातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी एकट्या भारतात २५ टक्के केळींचं उत्पादन होतं. गेल्या वर्षी भारतानं केळीच्या निर्यातीतून तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली आहे.
जगातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी एकट्या भारतात २५ टक्के केळींचं उत्पादन होतं. गेल्या वर्षी भारतानं केळीच्या निर्यातीतून तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली आहे. पण यात महाराष्ट्रातील एका स्पेशल केळीनं दुबईकरांचं मन जिंकलं आहे. नुकतंच या स्पेशल केळीची एक खेप दुबईला रवाना झाली आहे.
केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील केळींना जगभरात खूप मागणी आहे. याठिकाणी घेतली जाणारी स्पेशल केळीची एक खेप नुकतीच दुबईला रवाना झाली आहे. जळगावातील या केळीला GI Tag मिळालं आहे. या स्पेशल केळीची सध्या २२ मेट्रीक टन इतकी पहिली खेप दुबईला पाठविण्यात आली आहे. जळगावच्या तलवंडी गावातील शेतकऱ्यांकडून दुबईकरांनी केळी विकत घेतली आहे. देशाच्या कृषी क्षेत्रात महाराष्ट्रानं नेहमीच मोलाचं योगदान केलं आहे. जळगावनं ते आज पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे.
जळगावच्या केळींमध्ये स्पेशल काय?
महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील केळींमध्ये इतर केळींच्या तुलनेत अधिक फायबर आणि मिनिअलयुक्त असतात. याच खास गुणधर्मामुळे जळगावच्या केळींना २०१६ साली GI टॅग देण्यात आला होता. हा टॅग जळगाव जिल्ह्यातील निसर्गराज कृषी विज्ञान केंद्रासोबत नोंदणीकृत करण्यात आला आहे.
देशानं केली ६०० कोटींची उलाढाल
गेल्या काही वर्षात जागतिक स्तरावर भारताच्या कृषी क्षेत्राच्या निर्यातीत वाढ झाल्याचा पाहायला मिळालं आहे. यात क्षमता आणि मूल्य या दोन्ही बाबतीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. २०१८-१९ साली भारतानं एकूण १.३४ लाख टन इतकी केळी निर्यात केली आणि याची एकूण उलाढाल ४१३ कोटी रुपये इतकी होती. तर २०१९-२० या वर्षात कोरोना महामारीमुळे निर्बंध असतानाच्या काळातही देशानं १.९५ लाख टन केळींची निर्यात केली आणि तब्बल ६६० कोटी रुपयांची उलाढाल केली. तर २०२०-२१ या वर्षात हिच उलाढाल ६१९ कोटी रुपये इतकी झाली आहे.
जगातील एकूण केळी उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन भारतात
जगातील केळी उत्पादन देशांमध्ये भारताचं नाव अग्रस्थानी आहे. एकूण उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन हे एकट्या भारतात होतं. यात आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात केळीचं उत्पादन होतं.
काय असतो GI टॅग?
जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच GI टॅग एखाद्या क्षेत्रातील विशेष उत्पादनाला बहाल केला जातो. जेणेकरुन संबंधित उप्तादनाची विशेष भौगोलिक ओळख यातून निश्चित होते. जसं की जळगावची केळी, दार्जिलिंगचा चहा, चंदरी साडी, सोलापूरची चादर, म्हैसूर सिल्क, भागलपुरी सिल्क आणि बिकानेरच्या भुजिया यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे.