चला, आपला बायोडेटा अपडेट करा ! महाकाय कंपन्यांना हवेय ग्रामीण भागातील टॅलेन्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 08:11 AM2022-01-05T08:11:41+5:302022-01-05T08:11:50+5:30
वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर, अनेक कंपन्यांनी विद्यमान कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुनर्रचना केली आहे. यामध्ये प्रवास भत्त्याऐवजी, संगणक, इंटरनेट किंवा घरातून कामकाज सुलभ होण्यासाठी घरात अनुषंगिक इंटिरियरचे बदल करण्यासाठी काही भत्ते दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ निवाऱ्याची सोय नसल्यामुळे किंवा मिळणाऱ्या पगारातील मोठा हिस्सा निवाऱ्याच्या सोयीसाठी जात असल्यामुळे मेट्रो शहरातील नोकरीची संधींचा विचारही न करू शकणाऱ्या अनेकांना कोरोनामुळे आता दिलासा मिळाला आहे. अस्मानी संकट ठरलेला कोरोना ही संधी कशी?, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र, कोरोनामुळे अनेक उद्योगांनी पुढची किमान तीन वर्षे वर्क फ्रॉम होमचे मॉडेल स्वीकारल्यामुळे, आता केवळ एखाद्या विशिष्ट शहरातील लोकांनाच संधी देण्याऐवजी, उत्तम दर्जाचे टॅलेंट मिळविण्यासाठी आपले अवकाश आता द्वितीय, तृतीय श्रेणीतील नागरी भाग, अन् खेड्यांच्या दिशेनेही विस्तारले आहे. परिणामी, घरी बसून आपल्या बायोडेटावर महाकाय कंपन्यात काम करण्याचा अनुभव जोडण्याची संधी तरुणांना प्राप्त झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होमचे मॉडेल रुजले. यामधे माहिती तंत्रज्ञान, वित्तीय व्यवस्थापन, व्यवसाय व्यवस्थापन, विमा उद्योग, डिझायनिंग, इंजिनिअरिंग, संशोधन-विकास अशी क्षेत्र अग्रेसर असून, या कंपन्यांनी आणखी किमान तीन वर्षे वर्क फ्रॉम मॉडेल सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. या माध्यमातून कंपनीचे काम पुढे नेतानाच, आपल्या विस्तार योजनेसाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती करताना नागरी आणि ग्रामीण भागातील लायक उमेदवारांचा शोध सुरू केल्याची माहिती टॅलेंट हंट रिसर्च संस्थेचे अधिकारी अभिनिष सचदेव यांनी दिली. या अनुषंगाने महाराष्ट्राचा विचार करायचा तर, टॅलेंट हंट करणाऱ्या कंपन्यांनी मुंबई, पुणे, ठाणे याच्या पुढे जात आपल्याकडे सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नांदेड अशा विविध शहरातून आलेल्या बायोडेटाची चाळणी सुरू केली आहे.
टॅलेंट हंट कंपन्यांकडे दररोज शेकडो बायोडेटा येत असतात. याचबरोबरीने, नोकरीची संधींची माहिती देणाऱ्या विविध पोर्टलवरदेखील मोठ्या प्रमाणावर बायोडेटा अपलोड होत असतात. जॉब्स पोर्टलवरील जाहिरातींचा ट्रेंडही बदलला असून, बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय देत, अर्ज सर्व शहरांसाठी खुले असल्याचे सुचित केले आहे. या माध्यमातून ज्यांची निवड मुलाखतीसाठी होते, त्या मुलाखती, अनुषंगिक परीक्षा असे सारेच ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे प्रत्यक्ष कर्मचारी आणि व्यवस्थापन यांची समोरासमोर भेट होण्याचीही गरज उरली नसल्याचे, मनुष्यबळ विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुमित्रा कृष्णमृर्ती यांनी सांगितले. हा ट्रेंड जसा देशांतर्गत पातळीवर दिसून येत आहे, तसाच तो ट्रेंड जागतिक पातळीवर दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रात चांगला अनुभव असलेल्या लोकांना भारतात बसून परदेशी कंपन्यात काम करणे शक्य झाले आहे.
नागरी, ग्रामीण भागातही होणार मुलाखती
आयआयटी, आयआयएम किंवा काही प्रमुख महाविद्यालयातील विद्यार्थांना कंपनीत घेण्यासाठी कॅम्पस रिक्रूटमेंटचा पर्याय आता नवा नाही. मात्र, अनेक कंपन्यांनी आता मुंबई, पुण्यापुरतेच मर्यादित न राहता, सांगली, कोल्हापूर, धुळे, नांदेड, नाशिक, चिपळूण, रत्नागिरी, अहमदनगर अशा शहरातील इंजिनिअरिंग, व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांशी संपर्क करण्याची योजना आखली आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपतेवेळी येथील मुलांची यादी तयार करत त्यांच्या मुलाखती घेत त्यांना संधी देण्याची योजना आहे.
वर्क फ्रॉम होमसाठी सुविधा
वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर, अनेक कंपन्यांनी विद्यमान कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुनर्रचना केली आहे. यामध्ये प्रवास भत्त्याऐवजी, संगणक, इंटरनेट किंवा घरातून कामकाज सुलभ होण्यासाठी घरात अनुषंगिक इंटिरियरचे बदल करण्यासाठी काही भत्ते दिले आहेत. नवीन कर्मचारी रुजू करून घेतानादेखील त्याच्या वेतनात अशाच पद्धतीने रचना करण्यात येत आहे. वर्क फ्रॉम होममुळे कार्यालयाचे भाडे, वीज, इंटरनेट, कर्मचारी सुविधा अशा खर्चात कंपन्यांची बचत होत असल्यामुळे, या बचतीचा काही भाग वेतनवाढीच्या रूपाने देण्याकडेही काही कंपन्यांचा कल आहे.