मेक इन इंडियाला ८.९ लाख पाहुण्यांची भेट
By Admin | Published: February 18, 2016 02:35 PM2016-02-18T14:35:04+5:302016-02-18T15:00:37+5:30
महाराष्ट्रात गुंतवणूकीचा ओघ वाढावा आणि त्याव्दारे रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाला एकूण ८.९ लाख पाहुण्यांनी भेट दिली.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - महाराष्ट्रात गुंतवणूकीचा ओघ वाढावा आणि त्याव्दारे रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाला एकूण ८.९ लाख पाहुण्यांनी भेट दिली. मेक इन इंडिया सप्ताहात पाच दिवसात महाराष्ट्रात विविध प्रकल्पांच्या गुंतवणूकीचे ७.९४ लाख कोटी रुपयांचे २५०० सामंजस्य करार करण्यात आले अशी माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली.
मेक इन इंडिया सप्ताह संपला असून, आता मेक इन इंडिया मोहिम सुरु झाली आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेक इन इंडिया सप्ताहात मराठवाडा, विदर्भात १.५ लाख कोटींची गुंतवणूक, खानदेशात २५ हजार कोटी, पुण्यात ५० हजार कोटी, मुंबई आणि कोकणात ३.२५ लाख कोटीच्या गुंवतणूकीचे सामंजस्य करार झाले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारताच्या इतिहासात मेक इन इंडियाने आपली छाप उमटवली असून, भारतात भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मेक इन इंडियाने पायंडा घालून दिला आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ८.५ लाख कोटीची गुंतवणूक होणार असून, त्याव्दारे तीस लाख रोजगार निर्मिती होईल हे मोठे यश आहे असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. जे सामंजस्य करार झाले आहेत ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता प्रयत्न केले पाहिजेत.
या सप्ताहात गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात १५.२० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कटिबद्धता दाखवली आहे. या सप्ताहात एकूण १०२ देश सहभागी झाले होते. १५० कार्यक्रमात १२५० वक्त्यांनी सहभाग घेतला. ९ हजार स्वदेशी आणि दोन हजार परदेशी कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्रात उद्योग-व्यवयास करणे सोपे बनले आहे, उद्योग अनुकुलतेचे महाराष्ट्र उत्तम उदहारण आहे, मंत्री आणि सरकारी अधिकारी आता उपलब्ध असतात आणि लवकरात लवकर मुद्दे सोडवतात असे मेक इन इंडियाला आलेले जेसीबी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विपीन सोधी म्हणाले.
.