‘गिफ्ट मिल्क’मुळे कुपोषणाचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 04:11 AM2018-08-12T04:11:38+5:302018-08-12T04:12:02+5:30
नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
नागपूर - नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल; शिवाय राज्यात ऐरणीवर असलेला बालकांच्या कुपोषणाचाही प्रश्न सुटेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या (एनडीडीबी) पुढाकाराने मदर डेअरी फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल प्रायव्हेट लि़मिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत शनिवारी महापालिके च्या हनुमाननगर येथील लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेत गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ‘गिफ्ट मिल्क’ उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आमदार नागो गाणार आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, राज्यात विशेषत: विदर्भात कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे, शिवाय शेतकºयांच्या आत्महत्याही होत आहेत. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळतात. ही गंभीर समस्या आहे, या उपक्रमामुळे दुधाला चांगला भाव मिळणार असल्याने शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. सोबतच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक दूध मिळणार असल्याने त्यांचे आरोग्य सुदृढ होईल. हा उपक्रम संपूर्ण राज्यासह देशातही सुरू करण्यात आल्यास दूध उत्पादक व बालकांच्या विकासात मोठे परिवर्तन होईल.
वाढदिवसाला दूधवाटप करा
२७ मे रोजी वाढदिवसानिमित्त भक्ती निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांनाच आपण मदर डेअरीचे दूध दिले. सर्वांनी वाढदिवस व अन्य समारंभात इतर पेय देण्यापेक्षा दूध द्यावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.