महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 09:34 AM2024-10-15T09:34:02+5:302024-10-15T09:36:48+5:30
भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे. शिंदेसेनेतर्फे माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात आले आहे. अजित पवार गटातर्फे पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून सातजणांची सोमवारी विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली. एकूण १२ सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना सात जागा भरून ५ रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. भाजपला तीन, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी दोन जागा देण्यात आल्या.
भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे. शिंदेसेनेतर्फे माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात आले आहे. अजित पवार गटातर्फे पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.
भाजपला ३ जागा
पक्ष संघटनेतील दोघांना भाजपने संधी दिली. बाबूसिंग महाराज राठोड यांना विधान परिषदेवर पाठवून बंजारा समाजाला संधी दिल्याचा संदेश भाजपने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीकडेच पोहरादेवी संस्थानमध्ये गेले होते.
उमेदवार निवडीमागील महायुती सरकारच्या घटकपक्षांची गणिते काय?
शिंदेसेनेला दाेन जागा; कायंदे दुसऱ्यांदा परिषदेवर
शिंदेसेनेने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे तिकीट लोकसभा निवडणुकीत कापले होते. त्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिममधून संधी दिली; पण त्या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर पुनर्वसन म्हणून हेमंत पाटील यांची हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्राचे अध्यक्षपद (राज्यमंत्री दर्जा) देण्यात आले होते, पण आता त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यात आले आहे. मनीषा कायंदे या आधीही एकत्रित शिवसेनेकडून विधान परिषदेवर गेल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर त्या शिंदेसेनेत गेल्या. आता त्यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.
अजित पवार गटाला दाेन जागा; निकटवर्तीयांना संधी
अजित पवार गटाकडून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना आणि मुस्लिम चेहरा म्हणून इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली आहे. पंकज हे विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर हे अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष आहेत. नायकवडी हे सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे माजी महापौर आहेत. ते अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. एकत्रित राष्ट्रवादीमध्ये असतानाही सांगलीच्या राजकारणात नायकवडी यांचा शरद पवार गटाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा संघर्ष राहिला.
राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीत या सात नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लगाेलग तसा प्रस्ताव देखील राज्यपालांकडे पाठविण्यात आला. राज्यपालांनी सायंकाळी यादीला मंजुरी दिली आणि राजभवनकडून राज्य सरकारला तसा निराेप कळविण्यात आला.