२० कोटींचे नुकसान थांबविणाऱ्या तीन आयएएस अधिका-यांना बदल्यांची भेट
By अतुल कुलकर्णी | Published: November 22, 2018 02:02 AM2018-11-22T02:02:49+5:302018-11-22T02:03:09+5:30
शासनाचे २० कोटी रुपयांचे नुकसान थांबवणा-या एमटीडीसीच्या तीन आयएएस अधिका-यांना खुलासे करण्याची नोटीस आणि बदलीची भेट मिळाली आहे. पण ज्या अधिका-याने हे सगळे केले त्यांच्या चौकशीच्या फाईलला कोणी हात लावण्यास तयार नाही.
मुंबई : शासनाचे २० कोटी रुपयांचे नुकसान थांबवणा-या एमटीडीसीच्या तीन आयएएस अधिका-यांना खुलासे करण्याची नोटीस आणि बदलीची भेट मिळाली आहे. पण ज्या अधिका-याने हे सगळे केले त्यांच्या चौकशीच्या फाईलला कोणी हात लावण्यास तयार नाही. एका अधिका-याला वाचविण्यासाठी काय केले गेले याची ही सुरस कथा आहे.
एमटीडीसीने मुंबई मेला शॉपिंग फेस्टीव्हलच्या आयोजनासाठी १ वर्षाकरिता निविदा काढल्या होत्या. त्यात ओकस् मॅनेजमेंट प्रा. लि. यांची निविदा सर्वात कमी दराची निघाली. ज्यांच्या कालावधीत निविदा निघाल्या ते एमटीडीसीचे एमडी विजय वाघमारे काही दिवस रजेवर गेले. त्याच काळात जॉर्इंट एमडी आशुतोष राठोड यांनी सदर कंपनीसोबत करार करताना कामाचा कार्यकाळ १ वरुन ५ वर्षे केला. एकदा निविदा अंतीम झाल्यानंतर आर्थिक भार वाढविणारे कोणतेही फेरबदल त्यात करता येत नाहीत, अशा केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचना असताना हा बदल केला गेला. त्यामुळे एमटीडीसीवर २० कोटींचा बोझा पडला. शिवाय मुदतवाढ देताना ६ व्या वर्षी देखील निविदा काढल्यानंतर जी कंपनी सर्वात कमी दराची येईल त्यांच्याच दराने जर ओक्स कंपनी काम करायला तयार असेल तर त्यांनाच पहिले प्राधान्य दिले जाईल, अशी अजब अटही त्यात टाकली गेली.
एमटीडीसीच्या मुख्य लेखाधिकाºयांनी असे बदल करण्यास विरोध केला पण त्यांचेही आक्षेप बाजूला ठेवून राठोड यांनी हा निर्णय घेतला. रजेवरुन आल्यानंतर वाघमारे यांनी या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले त्याला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी स्थगिती देत सचिव विजयकुमार गौतम यांना चौकशीचे आदेश दिले. दरम्यान एमटीडीसीचे एमडी वाघमारे यांची बदली झाली व तात्पुरता पदभार सुहास दिवसे यांच्याकडे दिला गेला.
सचिव गौतम यांनी दिवसे यांच्याकडे अहवाल मागितला तेव्हा त्यांनीही यात गंभीर अनियमितता झाल्या असून तपासाची व कारवाईची गरज असल्याचा अहवाल दिला. शिवाय दिवसे यांनी ओक कंपनीलाही कारणे दाखवा नोटीस दिली. दिवसे यांच्या नोटीसीच्या विरोधात ओक कंपनीने मंत्री रावल यांच्याकडे तक्रार केली, तेव्हा दिवसे यांच्या नोटीसीलाही मंत्री कार्यालयाने स्थगिती दिली. शिवाय मंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी दिवसे यांना ईमेल पाठवून तुमच्याकडे तात्पुरता पदभार असताना तुम्ही असे निर्णय घेऊ नका असे कळवले. त्यावर दिवसे यांनी काय घडले त्याचे पत्र लिहून अशा वातावरणात आपल्याला काम करणे शक्य नाही, असेही कळवून टाकले.
तो मेल येण्याआधी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाºया एमटीडीसीच्या बोर्ड मिटींगमध्ये ओक यांच्या कंपनीची निविदा रद्द करण्याचा निर्णय झाला होता व त्याचे मिनिट्सही तयार झाले होते हे विशेष. त्यानंतर दिवसे यांचीही बदली झाली. पुढे दिवसे यांच्या अहवालावर सचिव गौतम यांनी राठोड यांच्यावर कारवाईची शिफारस करत फाईल सामान्य प्रशासन विभागात पाठवली आणि गौतम यांचीच बदली करण्यात आली.
बदली हवी, त्यांनी पाठपुरावा करावा!
एका घटनेत गौतम, वाघमारे व दिवसे या तीन आयएएस अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आणि राठोड यांच्या चौकशीची फाइल सामान्य प्रशासन विभागात पडून आहे. ज्यांना बदली हवी. त्यांनी त्या फाइलचा पाठपुरावा करावा, असे आता एमटीडीसीमध्ये बोलले जात आहे.
पात्र नसताना पद : जॉर्इंट एमडी आशुतोष राठोड हे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी आहेत. ते या पदासाठी पात्र नसताना त्यांना हे पद दिले गेले आहे हे विशेष!