गिरगावकर पाणी वाचवण्यासाठी सरसावले
By admin | Published: May 30, 2016 02:11 AM2016-05-30T02:11:21+5:302016-05-30T02:11:21+5:30
राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळानंतर सर्वच ठिकाणी पाण्याची साठवण आणि पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई : राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळानंतर सर्वच ठिकाणी पाण्याची साठवण आणि पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा पाऊस जास्त होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. पण, तरीही पुढच्या वर्षी पाण्याची कमतरता भासू नये आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी गिरगावकर सज्ज झाले आहेत. गिरगावातील विहिरींची पाहणी करण्यात आली असून, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी करण्यात येणार आहे.
गिरगाव आणि आजूबाजूच्या परिसरात विहिरी आहेत. पूर्वीच्या काळी या विहिरींचा वापर केला जायचा. पण, गेल्या काही वर्षांत शहरीकरण होताना विहिरींचे मूळ स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे वापरातल्या विहिरी बंद झाल्या. तर, काही ठिकाणी टॉवर झाल्यामुळे विहिरी बुजविण्यात आल्या आहेत. जमिनीखाली टाकलेल्या वायर अशा काही कारणांमुळे जिवंत स्रोत मृत झाले आहेत. हे स्रोत जिवंत करण्यासाठी पाहणी सुरू करण्यात आली आहे. आंग्रे वाडी, गोमांतक वाडी आणि साई चौक येथील विहिरींची तपासणी ‘आम्ही गिरगावकर’च्या सदस्यांकडून करण्यात आली आहे.
या तिन्ही ठिकाणी विहिरी आहेत. मात्र, आता त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने पुढाकार घेऊन येथील स्थानिकांशी चर्चा केली. येथील विहिरींची पाहणी करण्यात आली असून, पुनर्वापरासाठी काय उपाययोजना आखता येतील, याची चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा प्रकारे आणि कुठे करता येऊ शकते याची प्राथमिक चर्चा सध्या गिरगावात सुरू असल्याची माहिती ‘आम्ही गिरगावकर’च्या रोहित जाधव यांनी दिली. गिरगावातील काही विहिरींतून पाण्याची चोरी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)