दूध भेसळखोरांना 3 वर्ष कारावास देणारा कायदा करणार - गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 02:18 PM2018-03-13T14:18:59+5:302018-03-13T14:18:59+5:30
राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांना शिक्षा करणारा कायदा लवकरच करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली.
मुंबई- राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांना शिक्षा करणारा कायदा लवकरच करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली. दूध भेसळीबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गिरीश बापट यांनी ही घोषणा केली. सध्या दूध भेसळखोरांना सहा महिन्यांची शिक्षा आहे. मात्र सहा महिन्यांची शिक्षा असल्यामुळे या प्रकरणात लगेच जामीन होतो. त्यामुळे ही शिक्षा तीन वर्षासाठी करण्याचा कायदा केला जाणार आहे.
ही शिक्षा तीन वर्षांपर्यंत वाढवली तर आरोपीला जामीन होणार नाही. त्यामुळे तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असणारा कायदा लवकरच केला जाईल, असं गिरीश बापट यांनी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं.
दरम्यान, सध्या दूधातील भेसळीची तपासणी करण्यासाठी राज्यात असलेल्या चार मोबइम व्हॅनमधून योग्य तपसाणी होत नसल्याची कबुली गिरीश बापट यांनी दिली. यापुढे या तपासण्यांमध्ये अधिक सातत्य असेल, असं आश्वासनही गिरीश बापट यांनी दिलं.