गिरीश गांधी यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा
By admin | Published: June 10, 2014 12:14 AM2014-06-10T00:14:56+5:302014-06-10T00:50:59+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा सांस्कृतिक आणि सामाजिक चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सदस्य गिरीश गांधी यांनी सोमवारी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचा सांस्कृतिक आणि सामाजिक चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सदस्य गिरीश गांधी यांनी सोमवारी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असतानाच गिरीश गांधी यांच्या राष्ट्रवादी सोडण्याचे वृत्त आल्याने त्यात आणखी भर पडली.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना पाठविलेल्या पत्रात गिरीश गांधी यांनी मागील पंधरा वर्षात राजकीय भूमिका पार पाडू शकलो नाही याबाबत दु:ख व्यक्त करतानाच राजीनामा देताना वेदना होत असल्याचे नमूद केले आहे. पक्षात असताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा लाभलेला स्नेह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसंगानुसार दिलेल्या प्रतिष्ठेबद्दल गांधी यांनी या नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.पक्ष सोडण्यामागचे कोणतेही कारण त्यांनी राजीनामा पत्रात दिले नाही. मात्र गेल्या काही वर्षापासून पक्षातील क्रियाशिलताच संपली होती, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कोणत्या पक्षात जाणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)