गिरीश महाजन, अदिती तटकरे यांच्या नियुक्तीवर आले एकाच दिवसात गंडांतर, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 07:19 IST2025-01-20T07:18:06+5:302025-01-20T07:19:07+5:30
Maharashtra Government News: राज्य सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतील दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला दुसऱ्या दिवशी रविवारी स्थगिती देण्यात आली आहे.

गिरीश महाजन, अदिती तटकरे यांच्या नियुक्तीवर आले एकाच दिवसात गंडांतर, कारण काय?
मुंबई - राज्य सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतील दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला दुसऱ्या दिवशी रविवारी स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्त मंत्री गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्त मंत्री अदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थागिती देण्यात आली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिंदेसेनेने दावा केला होता. रायगड जिल्ह्यात शिंदेसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत. शिंदेसेनेचे भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद हवे होते, पण जिल्ह्यात अजित पवार गटाचा एकच आमदार असूनही पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना देण्यात आले होते. त्याला शिंदेसेनेने आक्षेप घेतला होता.
नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला अजित पवार गटाने विरोध केला होता. नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक ७ आमदार आहेत, तर भाजपचे ५ आमदार आहेत. तरीही अजित पवार गटाचे नाशिक जिल्ह्यातील मंत्री माणिकराव कोकाटे यांना नंदुरबारचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याने नाराजी होती. नाशिक जिल्ह्यातील भाजपचा मंत्री नसतानाही जळगावचे महाजन यांना पालकमंत्रिपद दिल्याने नाराजी आणखी वाढली होती.
गोगावले, भुसे यांना पालकमंत्रिपद नाही
शिंदेसेनेला रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करायची होती. रायगड जिल्ह्यात गोगावले यांचे भावी पालकमंत्री असे बॅनरही लागले होते, मात्र अदिती तटकरेंची नियुक्ती झाल्याने गोगावले यांनी दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता.
नाशिकच्या पालकमंत्रिपदी महायुतीत शिंदेसेनेचे दादा भुसे होते. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपने घेऊन तिथे गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्याने भुसे नाराज होते, त्यातून त्यांनी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री न घेण्याचे ठरवले होते असे समजते. या वादातूनच मुख्यमंत्र्यांना या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली.