मुख्यमंत्री कुणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही ; महाजनांचा सेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 05:14 PM2019-06-22T17:14:21+5:302019-06-22T17:14:39+5:30
विधानसभा निवडणुकीला अवघे दोन-तीन महिने शिल्लक राहिले असतानाच, शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री कुणाचा यावरून रस्सीखेच सुरु आहे.
मुंबई – भाजप- शिवसेनामध्ये मुख्यमंत्री कुणाचा यावरून स्पर्धा लागली असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे शिवसेनाकडून सांगण्यात येत असतानाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावर मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार आणि अशी सर्वांचीच इच्छा असल्याचे ही ते म्हणाले. राज्यातील निकाल पाहिला तर मुख्यमंत्री कुणाचा होईल हे कुणाला सांगण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी शिवसेनला लगावला.
विधानसभा निवडणुकीला अवघे दोन-तीन महिने शिल्लक राहिले असतानाच, शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री कुणाचा यावरून रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनचा मुख्यमंत्री होणारा असल्याचे शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत असतानाच, आता भाजप नेत्यांनी यावर आपली प्रतिकिया देताना भाजपचाच मुख्यमंत्री असणार असल्याचा दावा केला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपच्या निवडणून आल्या आहेत. शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी सुद्धा भाजपने प्रयत्न केले आहे. आमची सगळ्यांची भूमिका आणि भावना आहे की, मुख्यमंत्रीपद भाजपकडे राहावे. मोठा भाऊ म्हणून सुद्धा आमची हीच भूमिका आहे.राज्यातील निकाल बघितले तर,कुणाचा मुख्यमंत्री असावा हे सांगण्याची गरज नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.
मुख्यमंत्री पदावरून सेना- भाजपमध्ये चढाओढा लागली असल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांच्यावतीने आपलाच मुख्यमंत्री होणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगण्यात येत आहे. त्यातच आता महाजन यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट केल्याने, यावर शिवसेना काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.