आजपर्यंत साधी चिमणी मारली नाही, शिकारीचा उद्देश अजिबात नव्हता; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 10:57 AM2017-11-28T10:57:12+5:302017-11-28T14:20:11+5:30
मुंबई- चाळीसगावच्या वरखेडे गावासह आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन गिरीश महाजन धावले असल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. गिरीश महाजन यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होते आहे. या प्रकरणावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी स्वतःहा शाकाहारी असून आजपर्यंत एक चिमणीसुद्धा मारली नाही. बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना रस्त्यात अचानक बिबट्या आल्याचा आरडाओरडा सुरू झाला. लोकांची आणि प्राण्यांची पळापळ सुरू झाली. त्यामुळे मी इतर अधिकाऱ्यांसह गाडीतून उतरलो. लोकांची सुरक्षा हा माझा उद्देश होता म्हणूनच खाली उतरलो. त्यामागे बिबट्याची शिकार करणं हा माझा अजिबात हेतू नव्हता. कुठलीही स्टंटबाजी मी केली नाही, असं स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे. जर मी तेथिल परिस्थिती पाहूनही गाडीत बसून राहीलो असतो तर मंत्री गाडीतून उतरलेही नाहीत, अशी ओरड झाली असती, लपून राहणं हा माझा स्वभाव नाहीच, म्हणून मी गाडीतून उतरून परिस्थितीला सामोरं गेलो, असंही गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत गिरीश महाजन यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावासह आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दिले. ते वरखेडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या दीपाली जगताप व सुसाबाई भिल्ल यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेण्यासाठी वरखेडे येथे गेले होते. यावेळी मंत्री महाजनांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या तसेच शोधमोहीम राबवून पाहणीही केली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे तळ वाढविण्यात येतील यासह राज्यभरातील तज्ज्ञांच्या सहकार्याने पुढील मोहीम राबविण्यात येईल. गरज पडल्यास मी २-३ दिवस या भागात तळ ठोकेन, असं आश्वासनही मंत्री महाजन यांनी दिलं.
नेमकं प्रकरण काय ?
चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी सोमवारी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी बंदूक घेत वनविभागाच्या शोधमोहिमेत सहभाग घेतला. वनक्षेत्रातील झाडा-झुडपांमध्ये मंत्र्यांनी नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला. चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने पशू, पक्षी यांच्यासह महिला, मुले यांचे बळी घेतले आहे. आतापर्यंत जवळपास पाच जणांचा बळी या बिबट्याने घेतला आहे. तर १२ ते १३ जण जखमी झाले आहेत. या नरभक्षक ठरलेल्या बिबट्याच्या संचारामुळे देशमुखवाडी, वरखेड, उंबरखेड, पिंप्राळा, पिलखोड, नांद्रे, काकडणे, सायगाव, आमोदे, तामसवाडी, पिंपळवाड म्हाळसा परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचx वातावरण आहे.