फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 21:53 IST2024-06-07T21:34:48+5:302024-06-07T21:53:31+5:30
कॅबनेट मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांचंही नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे.

फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले...
BJP Girish Mahajan ( Marathi News ) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारपासून वेगळं होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांची जागा भाजपमधील कोणता नेता घेणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. कॅबिनेट मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांचंही नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आलं असून सर्वांच्या सहमतीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र स्वत: महाजन यांनी प्रसारमध्यमांसमोर येत हा दावा फेटाळला असून देवेंद्र फडणवीस हेच आगामी काळातही उपमुख्यमंत्री राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, "मी राज्याचा उपमुख्यमंत्री होणार, मला गृहखातं मिळणार की अन्य कोणतं खातं मिळणार, याबाबत येत असलेल्या सर्व बातम्या निराधार आहेत. देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्री राहतील. भाजपच्या कोअर कमिटीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीनंतर आम्ही सर्व नेत्यांनी देवेंद्रजींना सांगितलं आहे की, तुम्ही राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. ते सरकार आणि पक्षसंघटनाही उत्तमपणे चालवू शकतात," अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळातही सरकारमध्ये राहावं, या मागणीसाठी आम्ही आमचे नेते अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेऊ, असंही महाजन यांनी सांगितलं आहे.
फडणवीस-अमित शाह भेटीत काय घडलं?
देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता फडणवीस यांचा सरकारमधून दूर होण्याचा निर्णय लांबवणीवर पडल्याचे समजते.
एनडीएला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी अद्याप नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झालेला नाही. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आपण महाराष्ट्रातील स्थितीवर सविस्तर चर्चा करू, तोपर्यंत तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून तुमचं काम सुरू ठेवा, असा सल्ला अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे किमान पुढील काही दिवस तरी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देता येणार नाही.