गिरीश महाजन यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन ; पोलीस प्रशासनाची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:09 AM2019-06-18T10:09:51+5:302019-06-18T10:14:39+5:30
बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने पोलिसांनी कार्यालयाची तपासणी केली. ज्यानंतर ही एक अफवा असल्याची माहिती समोर आली.
जळगाव – जिल्ह्याच्या पोलीस पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या एक निनावी फोनमुळे जळगावात खळबळ उडाली. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील संपर्क कार्यालयाबाहेर बॉम्ब ठेवल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने पोलिसांना दिली. बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने पोलिसांनी कार्यालयाची तपासणी केली. ज्यानंतर ही एक अफवा असल्याची माहिती समोर आली.
जळगाव पोलीस नियंत्रण कक्षात एका अज्ञात व्यक्तीने फोन करून गिरीश महाजन यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका वाहनात बॉम्ब असल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे काही मिनिटांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा फोन आला. त्यानंतर , बॉम्ब शोधक पथक यांनी कार्यालय आणि परिसर यांची कसून तपाससणी केली. प्रत्यक्षात मात्र , कोणतेही बॉम्बसदृश वस्तू आढळली नाही.त्यामुळे ही फक्त अफवा असल्याचे समोर आले.
जळगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पोलिसांना फोन करून खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे सुरु केले आहे. तसेच अफवा पसरवून पोलीस यंत्रणेस वेठीसधरणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.