“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 19:26 IST2024-05-03T19:26:27+5:302024-05-03T19:26:57+5:30
Girish Mahajan News: एकनाथ खडसे म्हणतात की, मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपाचा आहे. एक भूमिका घ्यायला हवी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
Girish Mahajan News: भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपामध्ये येणार असल्याचे जाहीर करून अनेक दिवस लोटले असले तरी अद्यापही भाजपा प्रवेशाबाबतच्या हालचाली पाहायला मिळत नाहीत. भाजपामधीलच काही नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षात परतण्यास विरोध करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंबाबत मोठे विधान केले आहे.
मीडियाशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. खडसे यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी भाजपाचे काम करावे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. कधी म्हणतात की, मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपाचा आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. एकनाथ खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे, असे त्यांचे सुरु आहे. आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, त्यामुळे एक भूमिका घेतली पाहिजे, असे गिरीश महाजन यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले.
उद्धव ठाकरेंनी केलेली चूक अक्षम्य, त्याचा फटका बसणारच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे ऋणानूबंध होते. आम्ही सन्मानाने मातोश्रीवर जायचो. आता मात्र उद्धव ठाकरेंना दररोज तीन ठिकाणी फिरावे लागते. कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसच्या ऑफिसला जावे लागते. प्रकाश आंबेडकरांनी बोलावले तर त्यांच्याही ऑफिसला जावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी इतकी वाईट स्थिती स्वतःवर ओढावून घेतली आहे. नरेंद्र मोदी राजकीय नाही तर वैयक्तिक कामात ठाकरे कुटुंबाला मदत करतील. मात्र उद्धव ठाकरेंनी केलेली चूक अक्षम्य आहे. त्याचा फटका बसणारच आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. आमच्या खिडक्या, दरवाजे तुमच्यासाठी उघडे नाहीत. तुम्हाला लोकांनीच बाहेर हाकलले आहे. आमच्याबरोबर निवडून आलात आणि गद्दारी केली. मोदींच्या सभेमुळे तुमच्या जागा निवडून आल्या. निवडून आल्यावर इतक्या वर्षांच्या संबंधांना तिलांजली दिली. आता काँग्रेससाठी मते मागत आहात. तुमची विश्वासार्हता आणि हिंदुत्व संपले, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.