भाजप मेळाव्यात गिरीश महाजनांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 05:39 AM2019-04-11T05:39:22+5:302019-04-11T05:39:48+5:30
जिल्हाध्यक्षांकडून माजी आमदारास मारहाण; अमळनेरमध्ये राडा; धक्कादायक प्रकार
अमळनेर (जि. जळगाव) : भाजप-शिवसेना महायुतीच्या अमळनेर येथील मेळाव्यात बुधवारी जोरदार राडा झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी आपल्याच पक्षाचे माजी आमदार डॉ. बी. एस.पाटील यांना व्यासपीठावरच बेदम मारहाण केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.
स्मिता वाघ यांची उमेदवारी भाजपने रद्द केल्याच्या रागातून कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे समजते. या प्रकारानंतर मारहाण झालेले माजी आमदार बी. एस. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
अमळनेर येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता भाजप उमेदवार आ. उन्मेश पाटील यांची प्रचारसभा होती. सभा सुरू असताना स्मिता वाघ यांच्या समर्थकांनी डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरवा, असे सांगून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर त्यापैकी काही जणांनी थेट व्यासपीठावर चढून डॉ. पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्त्यांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. सुमारे पाच-सात मिनिटे ही हाणामारी सुरू होती. या घटनेनंतर पाटील यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. बी. एस. पाटील हे भाजपचे माजी आमदार आहेत. पारोळ येथील सभेत पाटील यांनी माझ्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले, असा दावा स्मिता वाघ यांनी केला. तर उदय वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पाटील समर्थकांनी रात्री अमळनेर पोलीस स्टेशनला धडक दिली. मारहाण झालेले माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी सांगितले की, पक्षाच्या प्रचार सभेत झालेला प्रकार चुकीचा आहे. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना पदावरून हटवावे. त्यांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत भाजपचा प्रचार करणार नाही. पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करीत आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ म्हणाले की, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी पारोळा येथील मेळाव्यात आपल्यासह पत्नी स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा जाब कार्यकर्ते अमळनेरच्या सभेत विचारत होते. डॉ. पाटील यांनी आपल्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. माझ्या पत्नीविषयी आक्षेपार्ह कुणी बोलत असेल तर त्यांना सोडणार कसा?
का झाली मारहाण?
विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वाघ समर्थक नाराज आहेत. माजी आ. डॉ.बी.एस.पाटील व उदय वाघ यांच्यात सुरुवातीपासून वाद आहे. स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला पाटील यांचा विरोध होता.
भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. झालेला प्रकार हा गंभीर आहे. ज्यांनी हा प्रकार घडवून आणला असेल, त्यांच्यावर कारवाई ही निश्चित केली जाईल. डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण करीत असताना आपण कार्यकर्त्यांना सोडवित होतो. आपल्याला कोणतीही धक्काबुक्की किंवा मारहाण झालेली नाही.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री