मानपूर इथली वादग्रस्त जमीन परत करणार- गिरीश महाजन
By admin | Published: June 16, 2016 05:26 PM2016-06-16T17:26:03+5:302016-06-16T20:06:41+5:30
मी कोणाचीही जमीन हडपलेली नाही. ती जमीन मी आतापर्यंत पाहिली नसल्याचा खळबळजनक दावा गिरीश महाजनांनी केला.
Next
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 16- मानपूर इथे साखर कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेली वादग्रस्त जमीन परत करणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत दिली. मी कोणाचीही जमीन हडपलेली नाही. ती जमीन मी आतापर्यंत पाहिली नसल्याचा खळबळजनक दावा गिरीश महाजनांनी केला. जमीन माझ्या नावे होती हे माहीत नव्हतं. जमिनीबाबत एकनाथ खडसेंकडून समजल्याचंही यावेळी गिरीश महाजनांनी सांगितलं आहे. या जमिनीवरून महाजन यांच्यावर सध्या टीका सुरू आहे. त्या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही जमीन आपल्या मालकीची नाही तर सार्वजनिक म्हणजेच साखर कारखान्यासाठी घेतली होती. कारखाना सुरू नसल्याने ती वापराविना पडून होती. आपल्याला याची कल्पनाही नव्हती. आता मात्र जमिनीच्या मूळ मालकांना ही जमीन परत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भुसावळ तालुक्यातील मानपूर गावातील पाच एकर जमीन कवडीमोल भावानं गिरीश महाजनांनी 2002 मध्ये कारखान्यासाठी खरेदी केली होती. मात्र या जमिनीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात न केल्याने महाजनांनी निवडणूक अटींचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. या कारखान्यात शेतकऱ्यांना नोकरी देऊ, असं आश्वासन ही जमीन खरेदी करताना गिरीश महाजनांनी दिलं होतं. पण प्रत्यक्षात मागील 16 वर्षांत या पाच एकर जमिनीवर ना कारखाना उभा राहिला, ना शेतकऱ्यांना रोजगार मिळाला, असं समोर आलं आहे.
या जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची भावना तिथल्या शेतक-यांमध्ये असून, ही जमीन परत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी सर्व आरोप फेटाळत ही जमीन शेतकऱ्यांना परत देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.