डाऊन सिंड्रोम ते स्वयंसिद्धा...
By अोंकार करंबेळकर | Published: August 5, 2017 06:30 PM2017-08-05T18:30:40+5:302017-08-05T21:13:15+5:30
मुंबई, दि. 5- आपल्या बाळाला जन्मजात काहीतरी व्याधी आहे असं ऐकलं की आई-बाबा घाबरुन जातात. आता आपल्या बाळाचं काय ...
मुंबई, दि. 5- आपल्या बाळाला जन्मजात काहीतरी व्याधी आहे असं ऐकलं की आई-बाबा घाबरुन जातात. आता आपल्या बाळाचं काय होणार... ते इतरांसारखं कसं वाढणार... ते परिस्थितीला टक्कर देऊन कसं स्वत:च्या पायावर उभं राहणार.. त्याला सतत कोणाची तरी मदत लागणार या विचारांनी त्यांचं आयुष्य ग्रासून जातं. एकीकडे त्याच्या भविष्याची काळजी आणि दु:ख यामुळे त्यांची आणखीच कोंडी होते.
आदितीला डाऊन सिंड्रोम आहे असं डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा अमित आणि रिना वर्मा यांचीही अशीच स्थिती झाली होती. आदितीच्या हृदयाला छिद्र असल्याचंही निदान ती अडीच वर्षाची असताना झालं. त्यावेळेस तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. बदलीची नोकरी आणि डाऊन सिंड्रोम असणारी मुलगी यामुळे अमित आणि रिना दोघेही घाबरले होते. दिल्ली, जयपूर, पुणे अशा त्यांच्या बदल्या होत गेल्या. २००१ पर्यंत जयपूरमध्ये आदितीने स्पेशल स्कूलमध्ये शिक्षण घेतले मग पुढची चार वर्षे पुण्यात काढली आणि शेवटी नवी मुंबईत बेलापूरला आल्यावर स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानमध्ये आदिती शिकू लागली. बेलापूरला आल्यावर बदलीच्या नोकरीला कंटाळून अमित वर्मांनी नोकरी सोडून स्वत:च ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला. इकडे आदितीचं शिक्षणही होतंच. नंतर आदितीने स्वत:च आई-बाबांबरोबर आॅफिसमध्ये काम करायला सुरुवात केली. पण दिवसभरातत ती तेथे कंटाळून जायची. बेलापूरच्या एका मॉलमध्ये असणाऱ्या त्यांच्या आॅफिसमध्ये एक मुलगा चहा द्यायला याचा. तो सगळ्या दुकानांमध्ये, आॅफिसांत चहा द्यायचा. त्यांचा हिशेब करायचा, पैसे द्यायचा. हे सगळं आदितीला आवडायचं. घरीसुद्धा तिला स्वयंपाकाची आवड होतीच. आदितीच्या या आवडीला तिच्या आाई-बाबांनी ओळखलं आणि तिला स्वत:च्या पायावर उभं करायचं त्यांनी ठरवलं.
झालं. आदिती आणि तिचे आई-बाबा आता खास तिचं रेस्टॉरंट काढायच्या तयारीला लागले. त्याच मॉलमध्ये वरच्या मजल्यावर आदितीला जागा मिळाली. १ जानेवारी २०१६ रेस्टॉरंट सुरु झालं. 'आदितीज कॉर्नर' नावाचा बोर्ड लागला आणि ओव्हन, गॅस, फ्रिजसह आदिती स्वत:च्या रेस्टॉरंटमध्ये काम करु लागली. चहा, कॉफी, वेफर्स, मॅगीबरोबर तिने घरचे पदार्थही सुरु केले. आदितीच्या घरी रोज ठराविक लोकांचे जेवण तयार करुन ते डब्यातून इथं आणलं जातं. आजूबाजूला कामासाठी येणाºया लोकांना जेवायचं ते हक्काचं ठिकाणच झालंय. बरं.. हे जेवणही रोज तेचतेच नसतं... इथला मेनू रोज बदलतो.
आदितीच्या मदतीला परमजित हे अंकल नावाने ओळखले जाणारे काका आणि राम नावाचा एक मुलगा डिलिव्हरी बॉय मदतीला आहे. स्वत: गल्ल्यावर बसलेली आदिती सगळ्या लोकांवर लक्ष ठेवून असते. फोनवरुन चहा-कॉफी, जेवणाची आॅर्डर घेते. कोणी पैसे द्यायचे असतील, उधारी असेल तर रामला ती आठवण करुन देते. आदितीज कॉर्नरमध्ये येणाºया प्रत्येक माणसाचं ती हॅलो सर, हॅलो मॅडम म्हणून ती स्वागत करते. खानेमे आप क्या लेंगे असं व्यवस्थित विचारुन ती आजचा मेन्यूही सांगते. तुमचं खाणं होईपर्यंत तिच्या डोक्यात सगळा हिशेब तयार असतो. ग्राहकाची आणि त्याने खाल्लेल्या पदार्थाची नोंद करुन ठेवते. पैसे देऊन झाल्यावर थँक्यू म्हणून व्यवस्थित निरोप देते. डाऊन सिंड्रोमशी दोन हात करुन स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या आदितीची गोष्ट सगळ्या पालकांसाठीच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे त्याचेच शिक्षण घ्या म्हणजे तुम्ही करीअरचा आनंद घ्याल असं आदितीचं मत आहे. तुमच्या मुलांना जे करावंसं वाटतं त्यामागे नक्की उभं राहा अशी ती सगळ्या पालकांना विनंती करते.
जबरदस्त आकलन आणि एकाग्रता
डाऊन सिंड्रोम झालेल्या व्यक्ती चांगल्या प्रकारे एकाग्र होऊन काम करु शकतात. आदितीची आकलन शक्ती आणि एकाग्रता उत्तम आहे. तिला एखादी गोष्ट किंवा प्रक्रिया समजावून दिली की ती लगेच शिकते. नंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल किंवा पळवाट आपण काढायचा प्रयत्न केला तर ते तिला चालत नाही.रोज संध्याकाळी ती मला दिवसभराचा हिशेब देते. कधीही तिच्या हिशेबात एकाही रुपयाची खोट आलेली नाही. हिशेबानंतर ती उद्या लागणाऱ्या वस्तूही ती सांगते. मॉलमध्ये सगळ्यांकडे जाऊन चहा-कॉफीची उधारीही ती वसूल करते. मी तर तिला कधीकधी गंमतीत वसुलीभाई म्हणतो.
- अमित वर्मा, आदितीचे बाबा
हसतमुख आणि जबाबदार
आदितीने व्यवसाय सुरु केला तेव्हा पहिले काही दिवस काळजी वाटत होती. पण आता तिचा आत्मविश्वास पाहिल्यावर ती सगळी काळजी निघून गेली. आदिती रोज काहीतरी नवे शिकण्याचा आणि चुकांमधूनही शिकण्याचा प्रयत्न करते. एकदा तिचा मोबाइल तिच्या रेस्टॉरंटमधून चोरीला गेला, तेव्हापासून ती मोबाइल व्यवस्थित वापरायला लागली, सुरक्षित जागी ठेवू लागली. आम्हाला तिला हेच शिकू द्यायचं होतं. सगळ्या गोष्टी शाळेत शिकायला मिळणार नव्हत्याच. तिने अनुभवातून शिकत अडथळे पार केले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी ती हसतमुख असते. त्यामुळेच तिने भरपूर मित्र-मैत्रिणी-ग्राहक जोडलेले आहेत. कधीकधी ती म्हणते रविवारी तरी का बंद ठेवायचं हॉटेल? आपण रोजच सुरु ठेवू हॉटेल... सेल नही होगा तो कैसे आगे बढेंगे, सेल है तो सब है असं म्हणायची.. शेवटी मी तिला सुटीचं महत्त्व समजावल्यावर ती रविवारी सुटी घ्यायला तयार झाली.
- रिना वर्मा, आदितीची आई
अष्टपैलू आदिती...
आदितीला शाळेत गणित विशेष आवडायचं. २०१०मध्ये तिला बेस्ट स्टुडंट पुरस्कारही मिळाला होता. शाळेमध्ये तिने नृत्य आणि नाट्यस्पर्धांमध्येही भाग गेतला. २०१२ साली तिला उत्कृष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला होता. बंगळुरुमध्ये मागच्या वर्षी झालेल्या सेल्फ अॅडव्होकेट फोरम अआॅफ इंडियामध्ये तिने उद्योजिका म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले होते.