अभियांत्रिकीची तरुणी रमलीय डाळिंब बागेत
By admin | Published: December 20, 2015 10:47 PM2015-12-20T22:47:58+5:302015-12-21T00:50:59+5:30
जाखणगावची एकता भगतची कहाणी
उत्तम शेती, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी असे समजले जायचे. कृषिप्रधान देशात शेतकरी हा प्रतिष्ठित व श्रीमंत समजला जायचा. कालांतराने उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ शेती असे समीकरण बनले. शेतीतील बदलते रूप आणि शेतमालाला बाजारपेठेत मिळणारा भाव, यामुळे शेती हा धंदा अडचणीत येत गेला. शिक्षण घेतलेली तरुणाई घाट्यातील शेती करावयास धजत नाही.
खटाव तालुक्यातील नेहमी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या जाखणगाव येथील शेतकरी कुटुंबातील एकता राजेंद्र भगत याला अपवाद ठरली. तिने अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शेतीतच वडिलांना सहकार्य करण्याचा निश्चय केला आहे.
एकताचे शिक्षण ईएनटीसी (डिप्लोमा ईन इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेली कम्युनिकेशन) झालेले आहे. वडिलांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. वडील शेतकरी असल्यामुळे शेती कामाची लहानपणापासूनची सवय तसेच आवड. त्यामुळे शेतीविषयी अधिक माहिती घेणे तिला अधिक आवडते. वडिलांना शेतात आईदेखील सहकार्य करून हातभार लावते.
‘वडिलांनी शिक्षण देऊन मला माझ्या पायावर उभे राहण्याची ताकद व बळ दिले; परंतु त्या आनंदापेक्षा मी इंजिनिअर जरी झाले तरी माझे शेतीशी असलेले नाते मी कधीच विसरणार नाही. उलट मला शेतातील कामे करणे फार आवडते. मला अद्यापपर्यंत नोकरीच्या पाठीमागे लागावे, असे वाटलेच नाही. उलट माझा मोकळा वेळ मी शेतातच अधिक घालवते. शेती करत असताना आता रासायनिक खतांचा वापर अधिक केला जात आहे. त्यामुळे मातीचा पोत खराब होत चालला आहे. सेंद्रिय खतांची आणि हे केवळ बोलण्यापुरतेच न ठेवता आमच्या शेतात आम्ही सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करतो.
नवनवीन तंत्रज्ञान तसेच इंटरनेटमुळे जग जवळ आल्यामुळे एकताने घरी बसून इंटरनेटवरून आता प्रचलित होत असलेली हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनावरांचे खाद्य बनवण्याच्या तंत्राचा वापर करून शेतातील पिकांबरोबरच शेतीपूरक व्यवसायालाही महत्त्व देऊन गोठ्यातील जनावरांना देखील सेंद्रिय पद्धतीने खाद्य देऊन त्यांची निगाही राखण्यात एकता कमी पडलेली नाही.
नम्रता भोसले