आईचा फ्लॅट सोडण्याचे अखेर मुलीने दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 05:09 AM2020-06-23T05:09:14+5:302020-06-23T05:09:37+5:30
उच्च न्यायालयाने दिलेल्या सक्त ताकीदीनंतर मुलीने तिच्या मुलासह आठ आठवड्ययांत आईचे घर खाली करण्याची हमी दिली.
मुंबई : मुलगी शारीरिक व मानसिक छळवणूक करत असल्याने तिला आपले घर खाली करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी ७० वर्षीय महिलेची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली. उच्च न्यायालयाने दिलेल्या सक्त ताकीदीनंतर मुलीने तिच्या मुलासह आठ आठवड्ययांत आईचे घर खाली करण्याची हमी दिली.
मुलांना कर्तव्याची आठवण करून देताना उच्च न्यायालयाने रामायणातील श्रावणबाळाच्या कथेचा आधार घेतला. आपल्या गरीब, वृद्ध व अंध आईवडिलांची काशीयात्रेला जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना कावडीत बसवून ती कावड खांद्यावरून नेणाऱ्या श्रावण बाळाचा देशाला नेहमीच अभिमान वाटतो. आईवडिलांची तहान भागवण्यासाठी नदीवर पाणी आणायला गेलेला श्रावण राजा दशरथाच्या बाणाचा लक्ष्य ठरला, असे न्या. एस. जे. काथावाला व न्या. एन. आर. बोरकर यांनी म्हटले.
वृद्ध पालकांना आपल्या मुलांविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत, हे दुर्दैव आहे. ‘जर याचिककर्ती (आई) मुलीसोबत राहण्यास तयार नसेल तर तिने मुलीला तिच्या नालासोपारा येथील फ्लॅटमध्ये राहण्याचा सुचवलेला पर्याय मुलीने स्वीकारावा. त्यांनतर आठ आठवड्यात भाड्याने जागा शोधावी. तेवढ्या कालावधीत जागा नाही मिळाली तर मुलगी नालासोपारा येथील फ्लॅटमध्ये राहू शकते,’ असे न्यायालयाने म्हटले.