मालगाडीखाली येऊनही मुलगी वाचली
By admin | Published: June 5, 2017 06:07 AM2017-06-05T06:07:29+5:302017-06-05T06:07:29+5:30
दैव बलवत्तर असेल, तर काळही माणसाच्या जिवावर घाव घालू शकत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दैव बलवत्तर असेल, तर काळही माणसाच्या जिवावर घाव घालू शकत नाही. याची प्रचिती कुर्ला रेल्वे स्टेशनवरील एका घटनेतून आली आहे. भरधाव जाणाऱ्या रेल्वेखाली येऊनही १४ वर्षांच्या मुलीचा जीव वाचल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रणातून समोर आले आहे. गुरुवारच्या या घटनेचा हा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला.
कुर्ला रेल्वे स्थानकात गुरुवारी रूळ ओलांडताना १४ वर्षांची एक मुलगी अचानक वेगात असलेल्या मालगाडीखाली आली. आश्चर्याची बाब म्हणजे, मालगाडी तिच्यावरून जाऊनदेखील या मुलीला इजा झाली नाही. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर मालगाडी थांबवण्यात आली. त्यानंतर, या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
ही मुलगी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वरून ६ वर ट्रॅक ओलांडून जात होती. एअरफोन लावून मोबाइलवर बोलत ती ट्रॅकमध्ये उतरली. त्याच वेळी फलाट क्रमांक ६ वरून एक मालगाडी वेगाने सीएसटीच्या दिशेने येत होती. ही मुलगी ट्रॅकवरून येत असल्याचे काही प्रवाशांनी पाहताच त्यांनी आरडाओरडा करत, तिला बाजूला होण्यास सांगितले, पण ती फोनवर बोलण्यात मग्न असल्याने, तिच्या हे लक्षातच आले नाही आणि अखेर गाडीने तिला धडक दिली.
गाडीने धडक दिल्याने या मुलीचा मृत्यू झाला असावा, असे प्रत्यक्षदर्शींना वाटले. मात्र, काही प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरून पाहिले असता, ही मुलगी दोन्ही ट्रॅकच्या मधोमध सुखरूप होती. रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, मुलीला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून तिला सोडून देण्यात आल्याचे, कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भोरूडे यांनी सांगितले.