कळंबोलीत नैराश्येतून विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Published: July 22, 2016 01:46 AM2016-07-22T01:46:20+5:302016-07-22T01:46:20+5:30
अकरावी प्रवेशाचा घोळ अद्याप सुटला नसून चांगले गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे
कळंबोली : अकरावी प्रवेशाचा घोळ अद्याप सुटला नसून चांगले गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. कळंबोलीत गुरुवारी सायंकाळी सुधागड कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने एका विद्यार्थिनीने बहिणीच्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ८२ टक्के गुण प्राप्त करूनही चारही लिस्टमध्ये नंबर न लागल्याने तिने स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे.
पुष्पा धनाजी सूर्यवंशी (१६) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मूळची आटपाडी येथे राहणारी असून सध्या मावस बहिणीकडे शिक्षण घेत होती. दहावीला ८२ टक्के गुण मिळविल्यानंतर तिने अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा याकरिता आॅनलाइन अर्ज भरला होता. तिने दहावीची परीक्षाही याच सुधागड शाळेतून दिली होती. त्यामुळे याच ठिकाणी तिला अकरावीकरिता प्रवेश हवा होता. परंतु कटआॅफ लिस्ट ८६ टक्क्याला बंद झाली. त्यामुळे पुष्पाला नैराश्य आले.
मॅनेजमेंट कोट्यातून आॅफलाइन प्रवेशाकरिता तिचे पालक भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते अशोक मोटे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील होते. त्यांनी या संदर्भात प्राचार्य इक्बाल इनामदार यांची भेट घेवून प्रवेशाकरिता विनंती केली होती. इनामदार यांनी सुध्दा कोणतेही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, त्यातल्या त्यात सुधागडमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा याकरिता काऊन्सिलिंग राऊंडमध्ये प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता शुक्र वारपर्यंत थांबण्यास पुष्पाच्या पालकांना सांगितले होते.
करिअरबाबत अतिशय गंभीर असलेल्या पुष्पाने गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कळंबोली सेक्टर-४ मधील शिवदर्शन इमारतीतील घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास आम्ही सुरू केला आहे.
शुक्र वारी शाळेत जावून याबाबत माहिती घेवून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)